Skip to content

पाषाणमध्ये जुन्या वादातून तरुणावर खुनी हल्ला

एकाला अटक, एक अल्पवयीन ताब्यात

PG
Prashik Ghaste

1 min read

पाषाणमध्ये जुन्या वादातून तरुणावर खुनी हल्ला

एकाला अटक, एक अल्पवयीन ताब्यात

पुणे: पाषाणमधील संभाजी चौक परिसरात जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका २८ वर्षीय तरुणावर लोखंडी हत्याराने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, चतुःश्रृंगी पोलिसांनी एका १८ वर्षीय तरुणाला अटक केली आहे, तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
आदित्य जगन्नाथ मानवतकर (वय १८ वर्षे ३ महिने, रा. रहाटणी फाटा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासोबत असलेल्या एका विधीसंघर्षित बालकाला (अल्पवयीन मुलगा) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पाषाण परिसरात राहणाऱ्या एका २८ वर्षीय तरुणाने याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

भरचौकात गाठून मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. २८) रात्री सव्वा दहाच्या सुमारास फिर्यादी तरुण पाषाणमधील संभाजी चौकातील अकबर चिकन सेंटरजवळ थांबला होता. यावेळी आरोपी आदित्य मानवतकर आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराने तिथे येऊन जुन्या भांडणाचे कारण काढून फिर्यादीला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

लोखंडी हत्याराने डोक्यात वार
आरोपींनी सुरुवातीला फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपीने स्वतःजवळील लोखंडी हत्याराने फिर्यादीच्या डोक्यात आणि डाव्या हाताच्या कोपऱ्यावर जोरात वार करून त्याला गंभीर जखमी केले. या हल्ल्यामुळे परिसरात घबराट पसरली होती. आरोपींनी बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल
चतुःश्रृंगी पोलिसांनी या घटनेची दखल घेत आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२) आणि ३ (५) सह शस्त्र कायदा, फौजदारी कायदा दुरुस्ती अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. सहायक पोलीस निरीक्षक भांडवलकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Share