Skip to content

डेक्कन परिसरातील 'मोटेगावकर क्लास'वर पालिकेची कारवाई

या इमारतीवर ३ कोटी २० लाखांचा मिळकत कर थकीत, मनसेच्या आंदोलनाचा परिणाम

PG
Prashik Ghaste

1 min read

डेक्कन परिसरातील 'मोटेगावकर क्लास'वर पालिकेची कारवाई

या इमारतीवर ३ कोटी २० लाखांचा मिळकत कर थकीत, मनसेच्या आंदोलनाचा परिणाम

निलेश राऊत
पुणे: डेक्कन परिसरातील एका भोगवटा पत्र नसलेल्या अनधिकृत इमारतीमध्ये 'मोटेगावकर क्लास' गेल्या चार वर्षापासून सुरू असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) उघडकीस आणूनही कारवाई न झाल्याने मंगळवारी मनसे कडून महापालिकेत आंदोलन करण्यात आले. याची दखल घेत आज सकाळी तातडीने महापालिकेच्या बांधकाम विभागाने मोटेगावकर क्लास असलेली इमारत सील केली आहे.

डेक्कन जिमखाना येथील एका इमारतीमध्ये आर.सी.सी. मोटेगावकर क्लासेस गेल्या चार वर्षापासून चालवला जातो. या इमारतीला भोगवटा पत्र मिळालेले नाही. याबाबत मनसे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी २३ मार्च रोजी महापालिकेकडे तक्रार केली होती. त्यावेळी महापालिका आयुक्तांनी बांधकाम विभागाला संबंधित मिळकत तातडीने सील करण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले होते.

भोगवटा पत्र नसल्याने मिळकतकर विभागाने संबंधित मिळकतीला तिप्पट दंड करून ३ कोटी २० लाखाची कर आकारणी केली. मात्र, बांधकाम विभागाने काहीही कारवाई केली नाही. आता नीट पेपर फुटीमध्ये आर.सी.सी. मोटेगावकर क्लासेसच्या प्रमुखाचा सहभाग असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर संभूस यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी मंगळवारी महापालिका भवनात आंदोलन केले. यावेळी शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन देत कारवाईकडे दुर्लक्ष करणाऱ्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

दरम्यान आज ( दि. २० मे) सकाळी बांधकाम विभागाने ही इमारत सील केली.

पुणे क्राईम न्युज

Share