तक्रार निवारण दिनाला मुंबईकरांचा उदंड प्रतिसाद
एकाच दिवसात १,०१७ तक्रारींवर पोलिसांची सुनावणी
1 min read

एकाच दिवसात १,०१७ तक्रारींवर पोलिसांची सुनावणी
मुंबई: मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत सर्व पोलीस ठाण्यांमध्ये शनिवारी (ता. २५) आयोजित करण्यात आलेल्या 'तक्रार निवारण दिना’ला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात एकूण १,०१७ तक्रारदारांनी प्रत्यक्ष हजेरी लावून आपल्या समस्या मांडल्या. यामध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडवण्यावर भर देण्यात आला.

पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या आदेशानुसार आणि पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांच्या देखरेखीखाली दर शनिवारी या विशेष दिनाचे आयोजन केले जाते. त्यानुसार, आज मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सकाळी १० वाजल्यापासून तक्रार निवारण कक्ष सक्रिय झाले होते.
महिला आणि ज्येष्ठांचा सहभाग
आजच्या सत्रात एकूण १,०१७ तक्रारदारांपैकी ३७२ महिला तक्रारदार आणि १७४ ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. पोलीस ठाण्यात आधीच दाखल असलेले दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे, तसेच प्रलंबित असलेले तक्रार अर्ज यावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि संबंधित तपास अधिकाऱ्यांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेऊन जागेवरच अनेक तक्रारींचे निरसन केले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
या उपक्रमादरम्यान संबंधित विभागाचे सहायक पोलीस आयुक्त (ACP) पोलीस ठाण्यांमध्ये उपस्थित होते. तसेच, प्रादेशिक विभागांचे अपर पोलीस आयुक्त (Addl CP) आणि परिमंडळीय पोलीस उपआयुक्तांनी (DCP) विविध पोलीस ठाण्यांना भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. पोलिसांशी थेट संवाद साधता आल्यामुळे तक्रारदारांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
Mumbaikars' overwhelming response to Grievance Redressal Day


