Mumbai News : डिलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर गौतम अदानींची ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवारांशी भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Mumbai News : येत्या सोमवारी लोकसभेत मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडले जाणार; रुग्णालयात दोन तास झालेल्या भेटीमुळे राजकीय तर्कवितर्कांना वेग
2 min read

Mumbai News : मुंबई :- संसदेच्या विशेष अधिवेशनात येत्या सोमवारी लोकसभेत मतदारसंघ पुनर्रचना विधेयक (Delimitation Bill) मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात येणार असताना, शनिवारी उद्योजक गौतम अदानी यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. प्रकृती अस्वस्थामुळे शरद पवार सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असून, या पार्श्वभूमीवर झालेली ही भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.
सकाळी अकरापासून दुपारी एकपर्यंत रुग्णालयात वास्तव्य; तब्बल दोन तास चर्चा
मिळालेल्या माहितीनुसार, गौतम अदानी हे शनिवारी सकाळी साधारण 11 वाजता शरद पवार यांच्या भेटीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यानंतर ते तब्बल दोन तास रुग्णालयात होते. दुपारी साधारण एक वाजण्याच्या सुमारास गौतम अदानी रुग्णालयातून बाहेर पडले. देशातील आघाडीचे उद्योजक असलेल्या गौतम अदानी यांचा रुग्णालयातील हा दोन तासांचा मुक्काम आणि शरद पवारांशी झालेला संवाद याबाबत राजकीय व उद्योग वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात असले तरी, दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.
सोमवारी विधेयक मांडण्याची शक्यता; मविआत खळबळ
गेल्या अधिवेशनात इंडिया आघाडीने लोकसभेत हे विधेयक हाणून पाडले होते. हे घटनादुरुस्ती विधेयक असल्याने मंजुरीसाठी दोनतृतीयांश म्हणजेच 360 मतांची आवश्यकता आहे. भाजपने शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुकसह इतर काही पक्षांची मनधरणी करून मतांची बेगमी केल्याचे बोलले जात असून, शरद पवार गटाच्या संभाव्य पाठिंब्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि महाविकास आघाडीत मोठी खळबळ उडाली आहे. अशा वेळी शरद पवार यांची डिलिमिटेशन विधेयकासंदर्भातील नेमकी भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नसताना झालेली ही भेट विशेष लक्षवेधी ठरली आहे.
https://epaper.maharashtramirror.com/

hey, i am vikrant kulkarni news and video editor of maharashtra mirror news paper




