Mumbai Mobile Robbery News : धार्मिक सण आणि सभांमधील गर्दीत मोबाईल लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड; 52 मोबाईलसह 6 जणांना जे.जे. मार्ग पोलिसांनी ठोकल्या बेडया
Mumbai Police Arrested Mobile Robbers : मुंबईतील 16 गुन्हे उघड; चोरीचे मोबाईल नेपाळ आणि बांगलादेशात विकण्याचे रॅकेट उघडकीस, पोलिसांनी वेशांतर करून रचला होता सापळा
2 min read

Mumbai Police Arrested Mobile Robbers : मुंबईतील 16 गुन्हे उघड; चोरीचे मोबाईल नेपाळ आणि बांगलादेशात विकण्याचे रॅकेट उघडकीस, पोलिसांनी वेशांतर करून रचला होता सापळा
मुंबई :- रमजान महिन्याच्या निमित्ताने दक्षिण मुंबईतील गजबजलेल्या भेंडी बाजार आणि बोहरी मोहल्ला परिसरात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्या एका सराईत आंतरराज्यीय टोळीचा सर जे.जे. मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल 52 महागडे मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. या टोळीचे धागेदोरे थेट नेपाळ आणि बांगलादेशपर्यंत जोडलेले असल्याचे तपासात समोर आले आहे. Mumbai Police Latest Crime News
वेशांतर करून 3 दिवस पाळत
26 फेब्रुवारी 2026 रोजी अब्दुल रहमान सय्यद या तरुणाचा रेडमी मोबाईल भेंडी बाजार परिसरातून चोरी झाला होता. या गुन्ह्याचा तपास करताना जे.जे. मार्ग पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी प्रशांत नेरकर आणि त्यांच्या पथकाने सलग तीन दिवस बोहरी मोहल्ला, नळ बाजार आणि मस्तान तलाव परिसरात वेशांतर करून सापळा रचला होता. 2 मार्च रोजी मस्तान तलाव येथे एक संशयित व्यक्ती पोलिसांच्या जाळ्यात अडकली आणि तिथूनच या मोठ्या टोळीचा सुगावा लागला.
कुर्ला रेल्वे स्टेशनवरून साथीदारांना बेड्या
ताब्यात घेतलेल्या संशयिताची चौकशी केली असता, त्याचे इतर 5 साथीदार उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने दोन पथके तयार करून कुर्ला रेल्वे स्टेशन गाठले आणि तिथून पाच जणांना शिताफीने ताब्यात घेतले. या टोळीने मुंबईत ठिकठिकाणी भाड्याने खोल्या घेऊन चोरीचा अड्डा बनवला होता. झडती घेतली असता त्यांच्याकडे एकूण 52 मोबाईल सापडले, ज्यातून मुंबईतील 16 चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
चोरीचे मोबाईल 'आंतरराष्ट्रीय' बाजारात
तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे की, ही टोळी धार्मिक सण, राजकीय सभा आणि गर्दीच्या ठिकाणांचा फायदा घेऊन मोबाईल चोरायची. त्यानंतर हे मोबाईल सीमेपलीकडे नेपाळ आणि बांगलादेशात त्यांच्या हस्तकांमार्फत विकले जात असत. यामुळे या टोळीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून त्या दिशेने अधिक तपास सुरू आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी
1) साकीब अशफाक खान (30, कानपूर, उ.प्र.)
2) सरताज सरफराज शेख (27, उनाव, उ.प्र.)
3) आमीर आबिद खान (41, कानपूर, उ.प्र.)
4) इस्तीयाक सादिक खान (37, कौसा, ठाणे)
5) गोहर गुलाम जिलानी (48, कानपूर, उ.प्र.)
6) अफजल उस्मान नाई (35, बुन्नोज, उ.प्र.)
ही धडाकेबाज कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सह-आयुक्त सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उप-आयुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रईस शेख आणि पीएसआय प्रशांत नेरकर यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.


