Mumbai Crime News : माउंट मेरी जत्रेच्या पहिल्याच दिवशी 12 चोरटे गजाआड
•पोलीस पथकाची साध्या वेशात कारवाई, 9 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश
1 min read

•पोलीस पथकाची साध्या वेशात कारवाई, 9 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश
मुंबई :- मुंबईतील वांद्रे येथे सुरू झालेल्या प्रसिद्ध माउंट मेरी जत्रेच्या पहिल्याच दिवशी वांद्रे पोलिसांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई केली आहे. गर्दीचा फायदा घेऊन चोरी आणि पाकिटमारी करणाऱ्या तब्बल 12 सराईत चोरांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. या आरोपींमध्ये 9 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे.
दरवर्षी सप्टेंबरच्या दुसऱ्या रविवारी सुरू होणारी ही जत्रा एक आठवडा चालते. या काळात देशातून आणि परदेशातून लाखो भाविक वांद्रे येथे येतात. याच प्रचंड गर्दीचा गैरफायदा घेऊन काही चोरटे पाकिटमारी आणि मोबाइल चोरी करतात. ही बाब लक्षात घेऊन परिमंडळ- 9 च्या पोलिसांनी यावर्षी जत्रेसाठी विशेष पथक तयार केले होते.
साध्या वेशातील पोलिसांची कामगिरी
जत्रेच्या पहिल्याच दिवशी, रविवारी, पोलिसांचे हे पथक साध्या वेशात गर्दीत मिसळून लक्ष ठेवत होते. त्याचवेळी चोरी करताना पोलिसांनी 12 जणांना पकडले. या आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) विविध कलमांखाली 9 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी सांगितले की, अशा उत्सवांमध्ये चोरी करण्यासाठी देशभरातून 'फेस्टिव्हल चोर' मुंबईत येतात. पुढील एक आठवडा जत्रा चालणार असल्याने, हे विशेष पथक याच प्रकारे गस्त घालून या चोरट्यांवर लक्ष ठेवणार आहे.
पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी आणि पोलीस उपायुक्त दिक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने ही प्रभावी कामगिरी केली आहे.
हेही वाचा: बेकायदेशीर बेटिंग ॲप प्रकरणात युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स


