मोबाईल चोरीचा गुन्हा अवघ्या ४ तासांत उघड, ६६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
चंदननगर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
1 min read

चंदननगर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
पुणे: घरामध्ये शिरून सात मोबाईल लंपास करणाऱ्या सराईत चोरट्याचा शोध लावून चंदननगर पोलिसांनी अवघ्या चार तासांत गुन्हा उघडकीस आणला आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी १९ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून ६६ हजार रुपये किमतीचे सात मोबाईल आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे.

वेदांत गणेश चव्हाण (वय १९, रा. मांजरी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ (अ) नुसार गुन्हा (गु.र.नं. १७१/२०२६) दाखल करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. २७) चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीराम निवास, साईनाथनगर भागातील एका घरातून सात मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली होती. या चोरीबाबत तक्रार प्राप्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांनी तपास पथकाला तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
तांत्रिक विश्लेषणाने लावला शोध
तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार आरोपीचा शोध घेत असताना, तांत्रिक विश्लेषणाद्वारे वेदांत चव्हाण याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी त्याला मांजरी परिसरातून ताब्यात घेतले. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या वेदांतची कसून चौकशी केली असता, त्याने साईनाथनगरमधील घरातून मोबाईल चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेले ७ मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या चार तासांच्या आत पोलिसांनी आरोपीला जेरबंद केल्याने पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलीस उपायुक्त (परिमंडळ ७) सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल धस, सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस अंमलदार टी. आर. लिंगाण्णा, गुरव, डांगे, बेंद्रे आणि लहाने यांच्या पथकाने केली आहे.


