Skip to content

Missing Link : 'मिसिंग लिंक' की 'भ्रष्टाचाराची लिंक'? पहिल्याच पावसात प्रकल्पाचे पितळ उघडे!

मुंबई, महाराष्ट्र मिरर

DO
Dhanshree Otari

3 min read

Missing Link

Missing Link: मिसिंग लिंकच्या एन्ट्री पॉईंटजवळ स्लॅब कोसळल्याने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक ठप्प

मुंबई, महाराष्ट्र मिरर

Missing Link: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या 'मिसिंग लिंक' (Missing Link) प्रकल्पाची दुरवस्था पहिल्याच पावसाळ्यात समोर आली आहे. दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महायुती सरकारने मोठ्या थाटामाटात आणि 'जागतिक दर्जाचा प्रकल्प' असा गाजावाजा करत याचे उद्घाटन केले होते. (missing link mumbai pune expressway slab collapse)

मात्र, अवघ्या दोन महिन्यांच्या आतच या रस्त्यावर आधी खड्डे आणि आता थेट स्लॅब कोसळल्याची गंभीर घटना घडल्याने या कामाच्या दर्जावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सोमवारी पहाटे झालेल्या या मोठ्या दुर्घटनेमुळे मिसिंग लिंकवरील वाहतूक सुरक्षिततेच्या कारणास्तव पूर्णपणे बंद करण्यात आली असून, महामार्गावरील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. (Missing Link)

गेल्या काही तासांपासून लोणावळा, खालापूर आणि तळेगाव परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे सोमवारी पहाटेच्या सुमारास मिसिंग लिंकच्या एन्ट्री पॉईंटजवळ (टनेल क्रमांक २ च्या एक्झिटजवळ) एक मोठा स्लॅब कोसळला. हा स्लॅब कोसळल्यामुळे छताच्या भागातून डोंगरावरील दगड, माती, राडारोडा आणि पाण्याचा प्रचंड लोंढा थेट मुख्य रस्त्यावर आला. महामार्गावर अचानक आलेल्या या संकटामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली. (Missing Link)

https://www.instagram.com/p/DacAcuZotOG

सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने मोठी जीवितहानी टळली असली, तरी सुरक्षिततेचा उपाय म्हणून पुणे-मुंबई मार्गिकेवरील वाहतूक तातडीने रोखण्यात आली आणि ती लोणावळामार्गे वळवण्यात आली. उर्से टोल नाक्यावरच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून महामार्ग पोलिसांनी नागरिकांना अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय या मार्गाने प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्र्यांचे 'इंजिनिअरिंग' लॉजिक ठरले अपयशी!

काही दिवसांपूर्वीच या नव्याकोऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी डांबराचे थर उखडून खड्डे पडल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावरून विरोधकांनी सरकारला घेरल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे 'इंजिनिअरिंग' समर्थ केले होते. "कोणतेही मोठे काम पूर्ण झाल्यावर आणि पहिला पाऊस पडल्यावर रस्त्याची टिकाऊ क्षमता (Durability) तपासली जाते. ही एक तांत्रिक प्रक्रिया असून त्यानंतरच डांबराचा दुसरा लेयर दिला जातो. (Missing Link)

हेही वाचा: Alandi Flood: इंद्रायणीने ओलांडली धोक्याची पातळी; २५० वारकरी अडकले

नवीन उड्डाणपुलावर सुरुवातीला मास्टिक एस्फाल्ट जमा होते आणि काम सेटल होण्यासाठी वेळ लागतो, या केवळ इंजिनिअरिंगच्या गोष्टी आहेत," असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले होते. तसेच 'निंदकाचे घर असावे शेजारी' असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या टिकेला फारसे महत्त्व न देता MSRDC योग्य ती काळजी घेईल, असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या तांत्रिक दाव्यांमधील फोलपणा सोमवारी थेट स्लॅब कोसळल्याने उघडा पडला आहे.(Missing Link)

स्लॅब कोसळल्याची घटना समोर येताच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी सरकारवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप करत विचारले की, "मिसिंग लिंकवर आधी टिकाऊ क्षमता (durability) चेक करण्यासाठी खड्डे पडले होते, मग आज तीच durability चेक करण्यासाठी थेट दरड आणि स्लॅब कोसळला आहे का?"

Rain Update : ‘घराबाहेर पडू नका, ६ तारखेपर्यंतचे अलर्ट गांभीर्याने घ्या’

पुढे बोलताना त्यांनी "मिसिंग लिंकच्या कामात केवळ दलाली आणि भ्रष्टाचाराची 'लिंक' (Missing Link) झाल्याने जनतेची सुरक्षाच 'मिसिंग' झाली आहे. गेल्या चार-पाच दिवसांत पुण्यापासून मुंबईपर्यंत झालेल्या पावसाने या नतभ्रष्ट सरकारच्या पोकळ दाव्यांची पोलखोल केली असून, यांचे काळे कारनामे उघड झाले आहेत. महाराष्ट्राची जनता या भ्रष्ट सरकारला कधीही माफ करणार नाही." असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.

७ हजार कोटींच्या भव्य प्रकल्पावर पाणी

अंदाजे ७,१०० कोटींपेक्षा अधिक खर्च करून उभारण्यात आलेला १३.३ किलोमीटर लांबीचा हा 'मिसिंग लिंक' (Missing Link) प्रकल्प देशातील एक अभियांत्रिकी चमत्कार (Engineering Marvel) म्हणून प्रोजेक्ट केला गेला होता. यामध्ये देशातील सर्वात उंच केबल-स्टेड पूल आणि गिनीज बुकमध्ये नोंद झालेला जगातील सर्वात रुंद बोगदा असल्याचा दावा सरकारने केला होता. बोगद्याच्या वर असलेल्या लोणावळा तलावाच्या खालून हा मार्ग जातो. मात्र, पहिल्याच पावसाच्या सुरुवातीलाच प्रकल्पाचे छत कोसळल्याने आणि रस्ता उखडल्याने कंत्राटदार आणि संबंधित देखरेख अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर संशय व्यक्त केला जात आहे.(Missing Link)

Ashadhi Wari 2026 : पालखी सोहळ्यानिमित्त जादा बसेसचे नियोजन

सध्या घटनास्थळी ढिगारा उपसण्याचे आणि रस्ता साफ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, 'एमएसआरडीसी'च्या (MSRDC) अभियंत्यांचे पथक या तांत्रिक बिघाडाची तपासणी करत आहे. मात्र, या दुर्घटनेमुळे कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या नावाखाली प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याच्या भावना सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहेत.

पुणे–मुंबई तसेच मुंबई–पुणे (Missing Link) या दोन्ही दिशेची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे–मुंबई किंवा मुंबई–पुणे असा प्रवास करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. अत्यावश्यक प्रवास असल्यास कृपया प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या वाहतूकविषयक सूचना व अद्ययावत माहितीनुसारच प्रवास करावा. नागरिकांनी सहकार्य करावे, ही विनंती." (Missing Link)

Share