इंदापूर तालुक्यातील कळंब येथे मोठी घरफोडी
२० लाखांचे दागिने व रोकड लंपास
1 min read

२० लाखांचे दागिने व रोकड लंपास
पुणे: इंदापूर तालुक्यातील कळंब येथे एका शेतकऱ्याचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २० लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. सोमवारी (ता. २७) रात्रीच्या सुमारास अवघ्या सव्वा तासाच्या कालावधीत ही मोठी घरफोडी झाली असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

राहुल दत्तात्रय डोंबाळे (वय ३५, रा. कळंब, ता. इंदापूर) यांनी याप्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ (अ) आणि ३३१ (४) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
कुलूप तोडून घरात प्रवेश
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल डोंबाळे हे शेती करतात. सोमवारी रात्री ८.४५ ते १० वाजेच्या सुमारास त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. यावेळी अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील लाकडी कपाटाचे लॉकरही शिताफीने तोडले.
१९ लाख ९६ हजारांचा मुद्देमाल लंपास
चोरट्याने कपाटातील सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम, असा एकूण १९ लाख ९६ हजार ६०० रुपयांचा ऐवजी लंपास केला. फिर्यादी रात्री १० च्या सुमारास घरी परतले असता, त्यांना घराचे कुलूप आणि कपाटाचे लॉकर तुटलेले दिसले. कपाटातील मुद्देमाल गायब असल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. भरवस्तीत आणि कमी वेळेत झालेल्या या धाडसी चोरीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सहायक पोलीस निरीक्षक डुणगे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.


