Skip to content

Maharashtra Weather Update : उन्हाच्या चटक्यानंतर आता पावसाचा 'धडाका'; गुढीपाडव्याला राज्यावर अवकाळीचे संकट, विदर्भात गारपिटीचा इशारा

Maharashtra Weather Update Latest News : पुढील 4 दिवस राज्यात हवामानाची मोठी उलथापालथ; 18 मार्चला मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता, शेतकरी चिंतेत

V
Vivek

1 min read

Maharashtra Weather Update : उन्हाच्या चटक्यानंतर आता पावसाचा 'धडाका'; गुढीपाडव्याला राज्यावर अवकाळीचे संकट, विदर्भात गारपिटीचा इशारा

Maharashtra Weather Update Latest News : पुढील 4 दिवस राज्यात हवामानाची मोठी उलथापालथ; 18 मार्चला मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता, शेतकरी चिंतेत

पुणे :- राज्यात सध्या उन्हाचा तडाखा जाणवत असतानाच निसर्गाचा लहरीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्याच्या हवामानात मोठी उलथापालथ होणार असून, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे आणि हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 17 ते 20 मार्च या कालावधीत महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाचे सावट असेल.

विदर्भात गारपिटीचा तडाखा, कोकणात 'यलो अलर्ट'

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 18 मार्च हा दिवस राज्यासाठी अधिक धोक्याचा ठरू शकतो.

गारपिटीचा इशारा: बुधवारी (18 मार्च) अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या सहा जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता असून तिथे विशेष खबरदारी घेण्यास सांगितले आहे.

कोकण आणि मुंबई: 18 मार्चपासून मुंबईसह रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह हलक्या सरी कोसळू शकतात. या भागासाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्र व मराठवाडा
अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि लातूरसह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

तापमानाचा पारा चाळीशी पार

एकीकडे पावसाचे सावट असताना दुसरीकडे उष्णतेची लाटही कायम आहे. सोमवारी विदर्भातील वाशिम येथे राज्यातील सर्वाधिक 40.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुण्यात रात्रीचा पारा 16.4 अंशांपर्यंत खाली घसरल्याने काहीसा थंडावा होता, मात्र आता ढगाळ हवामानामुळे रात्रीच्या उकाड्यात मोठी वाढ होणार आहे. मुंबई, ठाणे आणि नाशिकसह 13 जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्रता कायम राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढली

उष्णतेची लाट, अवकाळी पाऊस आणि गारपीट असे त्रिपक्षीय संकट उभे राहिल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. काढणीला आलेली पिके आणि विशेषतः फळबागांना (आंबा, द्राक्षे) या हवामानाचा मोठा फटका बसण्याची भीती आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना आपली काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवण्याचे आणि नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Share