Maharashtra Transport Strike : महाराष्ट्र उद्यापासून 'चक्का जाम'च्या उंबरठ्यावर! ई-चलनविरोधात 300 वाहतूकदार संघटना ठाम; परीक्षांच्या काळात शालेय बस आणि मालवाहतूक रोखणार
Maharashtra Latest Strike News : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या बैठकीकडे लक्ष | आझाद मैदानावर दीड लाख वाहतूकदार एकवटणार | युद्ध आणि संपामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवड्याची भीती
1 min read

Maharashtra Latest Strike News : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या बैठकीकडे लक्ष | आझाद मैदानावर दीड लाख वाहतूकदार एकवटणार | युद्ध आणि संपामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवड्याची भीती
मुंबई :- राज्यातील वाहतूकदार संघटनांनी 5 मार्च पासून पुकारलेल्या राज्यव्यापी संपावर ठाम राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानली जाणारी मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक उद्यापासून ठप्प होण्याची चिन्हे आहेत. ई-चलन प्रणालीतील जाचक अटींविरोधात पुकारलेल्या या युद्धात राज्यातील तब्बल 300 संघटना सहभागी होणार आहेत. यामुळे आधीच युद्धाच्या सावटाखाली असलेल्या बाजारपेठेत आता वस्तूंचा तुटवडा आणि महागाईचा मोठा फटका बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
आझाद मैदानावर शक्तीप्रदर्शन; मध्यरात्रीपासून संप
वाहतूकदार संघटनेचे समन्वयक प्रसन्न पटवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या मुंबईतील आझाद मैदानावर राज्यभरातून 1 ते 1.5 लाख वाहतूकदार एकत्र येणार आहेत. जर संध्याकाळपर्यंत राज्य सरकारने ठोस आणि सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर उद्या मध्यरात्रीपासून संपूर्ण राज्यातील मालवाहतूक, टँकर्स आणि टप्प्याटप्प्याने शालेय बस वाहतूकही बंद केली जाईल.
विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढली
मार्च महिना असल्याने अनेक शाळांच्या वार्षिक परीक्षा सुरू होत आहेत. अशा महत्त्वाच्या काळात शालेय बस संघटनांनी संपात उडी घेतल्यास विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होण्याची भीती व्यक्त होत आहे. पालकांमध्ये या निर्णयामुळे चिंतेचे वातावरण असून प्रशासनाने तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे.
सरकारकडून मनधरणीचे प्रयत्न
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. यामध्ये परिवहन आयुक्त, पोलीस प्रशासन आणि वाहतूकदार प्रतिनिधी चर्चा करणार आहेत. "आखाती देशातील युद्धामुळे आधीच कंटेनर बंदरात अडकले आहेत, अशात संप झाला तर सर्वसामान्यांचे कंबरडे मोडेल," असे सांगत मंत्र्यांनी संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र, केवळ आश्वासनावर आम्ही मागे हटणार नाही, अशी भूमिका संघटनांनी घेतली आहे.
संपाचा दुहेरी फटका का?
1.युद्धजन्य परिस्थिती: इराण-इस्रायल वादामुळे आंतरराष्ट्रीय मालवाहतूक आधीच विस्कळीत झाली आहे.
2.स्थानिक संप: राज्यातील वाहतूक बंद झाल्यास बंदरातून येणारा माल शहरांपर्यंत पोहोचणार नाही, ज्यामुळे भाजीपाला, दूध आणि औषधांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.


