Skip to content

Maharashtra News : इराण-इस्रायल युद्धाचा वणवा महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर; पेट्रोल पंपांवर किलोमीटरभर रांगा, तर रिक्षालचालकांचा 'चक्काजाम'चा इशारा

Maharashtra Latest News : मुंबई ते बुलढाण्यापर्यंत इंधनासाठी 'हाहाकार'; अफवांच्या बाजारामुळे टंचाईत भर, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांनाही केराची टोपली

V
Vivek

2 min read

Maharashtra News : इराण-इस्रायल युद्धाचा वणवा महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर; पेट्रोल पंपांवर किलोमीटरभर रांगा, तर रिक्षालचालकांचा 'चक्काजाम'चा इशारा

Maharashtra Latest News : मुंबई ते बुलढाण्यापर्यंत इंधनासाठी 'हाहाकार'; अफवांच्या बाजारामुळे टंचाईत भर, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांनाही केराची टोपली

मुंबई :- मध्य पूर्वेतील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक ऊर्जा संकट ओढवले असून, त्याचे थेट पडसाद आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उमटताना दिसत आहेत. राज्यातील प्रमुख शहरांपासून ते ग्रामीण भागापर्यंत इंधन आणि गॅससाठी नागरिकांचा मोठा संघर्ष सुरू झाला आहे. रणरणत्या उन्हात तासनतास रांगेत उभे राहूनही इंधन मिळेल की नाही, या चिंतेने जनतेचा घामटा काढला आहे.

मुंबई आणि ठाण्यात 'पॅनिक बाइंग'मुळे गोंधळ

मुंबईत इंधनाचा पुरवठा निम्म्यावर आल्याचे चित्र आहे. जिथे दिवसाला 40 हजार लिटर पेट्रोल यायचे, तिथे आता केवळ 20 हजार लिटर येत आहे. यामुळे "पेट्रोल संपणार" अशा अफवा पसरल्या असून, दुचाकी आणि चारचाकी चालकांनी पंपांवर प्रचंड गर्दी केली आहे. ठाणे, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, रांगेत उभे राहण्यावरून अनेक ठिकाणी बाचाबाचीचे प्रकारही घडत आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षाचालक आक्रमक

छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅससाठी 1.5 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. जालना रस्त्यावर रिक्षाचालकांनी सकाळी 5 वाजेपासूनच गर्दी केली आहे. गॅस मिळत नसल्याने व्यवसाय ठप्प झाला असून, संतप्त रिक्षाचालकांनी रास्ता रोको आंदोलन केले. "गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास 30 तारखेला चक्काजाम करू," असा इशारा रिक्षा संघटनांनी दिला आहे. तसेच, फायनान्सवर घेतलेल्या रिक्षांचे हप्ते माफ करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

बुलढाण्यात चक्क 200 लिटरची टाकी भरून डिझेलची ने-आण

बुलढाणा जिल्ह्यात अफवांचा बाजार एवढा गरम आहे की, चिखली येथील एका ग्राहकाने चक्क २०० लिटरची पाण्याची टाकी विकत घेऊन ती डिझेलने भरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी इंधन साठ्यावर कडक निर्बंध लादले असले, तरी अनेक पंप चालक या नियमांचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात कॅन आणि टाक्यांमध्ये इंधन देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

जालन्यात पेट्रोल पंप झाले 'हाऊसफुल्ल' ऐवजी 'हाऊस-बंद'

जालना जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अनेक पेट्रोल पंप 'नो स्टॉक'च्या फलकासह बंद आहेत. बदनापूर तालुक्यातील ग्रामीण भागातून नागरिक मोठ्या आशेने पंपावर येत आहेत, मात्र इंधन नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पंप चालकांना बॅरिकेडिंग करावे लागले आहे.

Share