LPG Autorickshaw Price Hike : एलपीजी रिक्षाच्या इंधन दरात एकाच दिवसात 13 रुपयांची वाढ! गॅस टंचाईमुळे प्रवास महागणार; रिक्षाचालकांमध्ये चिंतेचे वातावरण
•छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस 62 रुपयांवरून थेट 75 वर; इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट प्रवाशांच्या खिशाला
1 min read

•छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस 62 रुपयांवरून थेट 75 वर; इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट प्रवाशांच्या खिशाला
मुंबई :- पश्चिम आशियातील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचा भडका आता महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या खिशाला चटके देऊ लागला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा असतानाच, आता एलपीजी (LPG) रिक्षांच्या इंधन दरात एकाच दिवसात तब्बल 13 रुपयांची विक्रमी वाढ झाली आहे. 62 रुपये प्रति लिटरने मिळणारा गॅस आता 75 रुपयांवर पोहोचल्याने रिक्षाचालक आणि प्रवाशांचे धाबे दणाणले आहेत.
एका रात्रीत गणित बिघडले
छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या या दरवाढीमुळे रिक्षाचालकांमध्ये संतापाचे आणि चिंतेचे वातावरण आहे. आखाती देशांमधील तेल रिफायनरींवर झालेल्या हल्ल्यांमुळे जागतिक बाजारपेठेत गॅसचा पुरवठा खंडित झाला आहे. याचा परिणाम म्हणून स्थानिक स्तरावर इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. रिक्षाचे इंधन महागल्याने आता शहरात रिक्षा भाडेवाढीची शक्यता वर्तवण्यात येत असून, त्याचा थेट फटका मध्यमवर्गीय प्रवाशांना बसणार आहे.
युद्धाचे भीषण परिणाम
28 फेब्रुवारी रोजी इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणने प्रतिहल्ला करत आखाती देशांमधील तेल साठ्यांना लक्ष्य केले. यामुळे:
होर्मुझची सामुद्रधुनी बंद: भारताला गॅस पुरवठा करणारा मुख्य सागरी मार्ग बंद झाल्याने देशात गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे.
घरगुती सिलिंडरमध्ये वाढ: काही दिवसांपूर्वीच घरगुती सिलिंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ करण्यात आली होती.
रोजगारावर संकट: व्यावसायिक गॅस मिळणे बंद झाल्याने अनेक हॉटेल चालकांनी हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
देवस्थानांनाही फटका
केवळ उद्योग किंवा वाहतूकच नाही, तर राज्यातील प्रमुख देवस्थानांच्या महाप्रसाद आणि अन्नछत्रांनाही या गॅस तुटवड्याचा फटका बसत आहे. गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने मोठ्या प्रमाणावर अन्नाची सोय करताना अडचणी येत आहेत.


