Skip to content

पीएमपी बसची चावी काढल्याशिवाय चालकाला सीट सोडताच येणार नाही

'पीएमपी' बस चोरीला जाऊ नये म्हणून उपाययोजना; चालक-वाहकांसाठी नवी नियमावली; निष्काळजीपणा केल्यास ठेकेदारांवर केली जाणार फौजदारी आणि दंडात्मक कारवाई

PG
Prashik Ghaste

2 min read

पीएमपी बसची चावी काढल्याशिवाय चालकाला सीट सोडताच येणार नाही

'पीएमपी' बस चोरीला जाऊ नये म्हणून उपाययोजना; चालक-वाहकांसाठी नवी नियमावली; निष्काळजीपणा केल्यास ठेकेदारांवर केली जाणार फौजदारी आणि दंडात्मक कारवाई

निलेश राऊत
पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) शहरातील सार्वजनिक वाहतुकीला सुरक्षित आणि शिस्त लावण्यासाठी नवे धोरण आखले आहे. बसचोरी, वाढते अपघात आणि कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून चालक आणि वाहकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता थेट फौजदारी कारवाई किंवा दंडात्मक बडगा उगारला जाणार आहे.

पीएमपी प्रशासनाने जारी केलेल्या आदेशानुसार बस , आता कोणत्याही परिस्थितीत विनाचालक सोडता येणार नाही. अनेकदा ब्रेकदरम्यान किंवा टर्मिनलवर चालक इंजिन चालू ठेवून खाली उतरतात, यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो. आता बस पार्क करताना इंजिन पूर्णपणे बंद करून चावी स्वतःकडे ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, बस केवळ अधिकृत आणि सुरक्षित ठिकाणीच पार्क करावी आणि पार्किंगच्या वेळी सर्व दरवाजे व्यवस्थित बंद आहेत, याची खात्री करण्याची जबाबदारी चालक-वाहकांवर सोपवण्यात आली आहे. याशिवाय प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या मद्यपी चालकांबाबत पीएमपीने कठोर भूमिका घेतली आहे. कर्तव्यावर असताना मद्यप्राशन किंवा कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थांचे सेवन आढळल्यास संबंधिताची सेवा तत्काळ खंडित करण्यात येईल. याशिवाय, शहरात विहित केलेल्या वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास आणि वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्यास दंड करणार आहे.

पीएमपी चालकाचे निलंबन
डेंगळे पुलावर बसला चावी ठेवून ती सोडून गेलेल्या चालकावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ठेकेदाराला त्या चालकास पुन्हा कामावर न घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात बस चोरून नेणाऱ्या व्यक्तीकडे पोलिस तपास करत आहेत. त्याने बस का चोरून नेली हे पोलिस तपासात स्पष्ट होईल, अशी माहिती पीएमपी प्रशासनाने दिली.

ठेकेदारांना सात दिवसांचा अल्टिमेटम
पीएमपी ताफ्यात असलेल्या खासगी ठेकेदारांच्या बसबाबतही अनेक तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर सर्व बस पुरवठादारांना सात दिवसांच्या आत नवीन नियमावलीच्या अंमलबजावणीचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

"प्रवाशांची सुरक्षितता हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. बस चोरी किंवा अपघातांच्या घटना टाळण्यासाठी आम्ही ही कडक पावले उचलली आहेत. सोमवारी सर्व बस पुरवठादारांची बैठक घेऊन त्यांना सक्त सूचना दिल्या आहेत. नियमांचे उल्लंघन कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही." - महेश आव्हाड, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

The driver will not be able to leave the seat without removing the PMP bus key.

Share