Kothrud Land | कोथरूडमधील ३६ एकर जमीन वादाला नवे वळण; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला उच्च न्यायालयाची स्थगिती
कोर्ट रिसीव्हरकडून जागेचा प्रतीकात्मक ताबा; १९६५ च्या वादग्रस्त खरेदीखताची फॉरेन्सिक तपासणी करण्याची युवक काँग्रेसची मागणी;
4 min read

सीबीआय आणि ईडी चौकशीची मागणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेपाचे आवाहन
पुणे, महाराष्ट्र मिरर : पुण्यातील कोथरूड येथील सर्व्हे क्रमांक ११३ मधील ३६ एकर ३७ गुंठे जमिनीच्या बहुशतकोटी रुपयांच्या वादाला आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे. या जमिनीचा ताबा बिल्डरकडे देण्याबाबत पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच न्यायालयाच्या निर्देशानुसार संबंधित जमिनीवर कोर्ट रिसीव्हरच्या प्रतीकात्मक ताब्याचा फलक लावण्यात आला आहे. या घडामोडीनंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली असून, केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालयामार्फत (ईडी) तपास करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत युवक काँग्रेसच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन यांनी या जमीन व्यवहारातील कथित अनियमिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. विशेषतः १९६५ मधील दस्तऐवज क्रमांक १४१४/१९६५ हा या जमिनीच्या मालकी हक्काच्या दाव्याचा महत्त्वाचा आधार असून, या दस्तऐवजात अनेक गंभीर त्रुटी असल्याचे त्यांनी सांगितले. या मूळ दस्तऐवजाची स्वतंत्र फॉरेन्सिक तपासणी करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
१९६५ च्या खरेदीखतात १०६ पाने गायब?
जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९६५ च्या खरेदीखतामध्ये अनेक गंभीर विसंगती आढळून आल्या होत्या. २०२१ मध्ये तत्कालीन सह जिल्हा निबंधकांनी या दस्तऐवजाची तपासणी करताना तब्बल १०६ पाने गायब असल्याची नोंद केली होती. त्याचबरोबर इंडेक्स-१ आणि इंडेक्स-२ नोंदवह्या, पावती पुस्तके तसेच दैनंदिन व्यवहारांच्या नोंदवह्या उपलब्ध नसल्याचेही निदर्शनास आले होते.
नोंदणी महानिरीक्षकांनी (आयजीआर) नियुक्त केलेल्या पाच सदस्यीय वरिष्ठ समितीनेही अधिकृत अभिलेखांमधील गंभीर त्रुटी अधोरेखित केल्या होत्या. संबंधित खरेदीखताची अंमलबजावणी नेमकी कशा प्रकारे झाली, याबाबत स्पष्टता नसल्याचे समितीच्या निरीक्षणांतून समोर आल्याचा दावा जैन यांनी केला.
एवढ्या महत्त्वाच्या जमिनीच्या मालकी हक्काचा आधार असलेल्या दस्तऐवजात इतक्या गंभीर त्रुटी आढळून आल्यानंतरही मूळ कागदपत्रांची स्वतंत्र फॉरेन्सिक तपासणी का करण्यात आली नाही, असा सवाल युवक काँग्रेसने उपस्थित केला आहे.
एफआयआर नोंदविण्याच्या आदेशानंतरही कारवाई नाही?
या प्रकरणात नोंदणी विभागाकडून २०२२ पासूनच फौजदारी तक्रार दाखल करण्यासंदर्भात अंतर्गत पत्रव्यवहार सुरू असल्याचे जैन यांनी सांगितले. राज्य माहिती आयोगासमोर आठ दिवसांत एफआयआर नोंदविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर २८ ऑगस्ट आणि २७ ऑक्टोबर २०२५ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडूनही यासंदर्भात पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र, २२ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या सुनावणीपर्यंतही एफआयआर दाखल करण्यात आला नसल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, २३ एप्रिल २०२६ रोजी नोंदणी विभागाचे उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी या प्रकरणात २७ एप्रिलपर्यंत एफआयआर दाखल करण्याचे आणि २८ एप्रिलपर्यंत अनुपालन अहवाल सादर करण्याचे कडक निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतर अवघ्या काही दिवसांत म्हणजे ८ मे २०२६ रोजी त्यांनी स्वतःच हा आदेश रद्द केला. या अचानक झालेल्या निर्णयामागील कारण स्पष्ट करण्यात यावे, अशी मागणी जैन यांनी केली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरही प्रश्नचिन्ह
कोथरूडमधील या जमिनीच्या ताब्याबाबत पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी ७ जुलै २०२६ रोजी दिलेल्या आदेशावरही युवक काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. २००६ मध्ये कोथरूड पोलिसांची रिसीव्हर म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करून जमिनीचा ताबा बिल्डरकडे देण्यात आला होता. गेल्या २० वर्षांत या जमिनीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नसल्याचे कारण या निर्णयासाठी देण्यात आल्याचे जैन यांनी सांगितले.
मात्र, गेल्या दोन दशकांत या जमिनीशी संबंधित अतिक्रमणाच्या अनेक तक्रारी कोथरूड पोलीस ठाणे, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस आयुक्त, पुणे महापालिका आणि महावितरणकडे करण्यात आल्या होत्या. या प्रकरणात गुन्हे दाखल झाले असून, काही दिवाणी दावेही न्यायप्रविष्ट आहेत. त्यामुळे कोणत्याही कायदा-सुव्यवस्थेच्या समस्या निर्माण झाल्या नाहीत, या आधारावर रिसीव्हरची नियुक्ती रद्द करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे जैन यांनी म्हटले.
५० वर्षांहून अधिक काळानंतर सातबारा उताऱ्यावर नोंद?
या जमीन प्रकरणातील आणखी एका मुद्द्याकडे लक्ष वेधताना जैन यांनी सांगितले की, सोलापूर येथील एका अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी वादग्रस्त खरेदीखताची महसुली अभिलेखात नोंद घेण्यासाठी ५० वर्षांहून अधिक काळाचा विलंब माफ केला होता. त्यानंतर संबंधित दस्तऐवजाची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचा त्यांचा दावा आहे.
सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना महसूल कार्यालयांमध्ये साध्या कामांसाठीही वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागते. मात्र, शेकडो कोटी रुपयांच्या जमिनीच्या व्यवहारात ५० वर्षांहून अधिक काळाचा विलंब माफ कसा करण्यात आला, असा सवाल युवक काँग्रेसने उपस्थित केला आहे.
सीबीआय, ईडी चौकशीसह फॉरेन्सिक ऑडिटची मागणी
पत्रकार परिषदेत बोलताना अक्षय जैन म्हणाले, "मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागाने दस्तऐवज क्रमांक १४१४/१९६५ मधील गंभीर त्रुटी वारंवार नोंदवल्या असताना मूळ दस्तऐवजाची स्वतंत्र फॉरेन्सिक तपासणी का करण्यात आली नाही? माहिती अधिकारांतर्गत अर्ज करूनही आयजीआर कार्यालयाने माहिती नाकारली. २३ एप्रिल रोजी एफआयआर नोंदविण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांनी ८ मे रोजी स्वतःच तो आदेश रद्द का केला? शेकडो कोटी रुपयांच्या जमीन व्यवहारात संशयास्पद अनियमितता असल्याने या प्रकरणाची तातडीने सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी व्हावी. मूळ अभिलेखांचे स्वतंत्र फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा."
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशानंतर कोर्ट रिसीव्हरकडून जमिनीचा प्रतीकात्मक ताबा घेण्यात आल्याने या वादाला न्यायालयीन स्तरावर नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील १९६५ च्या दस्तऐवजाची सत्यता, महसुली नोंदीतील बदल आणि यापूर्वीच्या प्रशासकीय निर्णयांची वैधता याबाबत पुढील काळात काय घडामोडी होतात, याकडे लक्ष लागले आहे.
या पत्रकार परिषदेला युवक काँग्रेसचे नेते भूषण रणभरे, एनएसयूआयचे प्रदेश उपाध्यक्ष अक्षय कांबळे, प्रदेश सचिव अथर्व सोनार, सागर धडवे आणि दिगंबर पाटील उपस्थित होते.

Founder Editor of Maharashtra Mirror




