Skip to content

Keshav Upadhye : ‘मराठा आंदोलनावर बोलताय कोण?’; मनोज जरांगेंच्या मुंबईतील प्रवेशानंतर भाजपचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

•‘शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस केवळ राजकारण करत आहेत’; केशव उपाध्ये यांची ‘एक्स’वर पोस्ट

V
Vivek

2 min read

Keshav Upadhye : ‘मराठा आंदोलनावर बोलताय कोण?’; मनोज जरांगेंच्या मुंबईतील प्रवेशानंतर भाजपचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

•‘शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस केवळ राजकारण करत आहेत’; केशव उपाध्ये यांची ‘एक्स’वर पोस्ट

मुंबई :- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेला महामोर्चा आज मुंबईत दाखल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप नेते केशव उपाध्ये यांनी 'एक्स'वर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

उपाध्ये यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मराठा समाजाचे मुंबईतील आंदोलन हे शांततामय आणि ऐतिहासिक होईलच, पण या आंदोलनाबाबत बोलतय कोण? महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाकडे दुर्लक्ष करणारे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस पक्ष. मराठा समाजाच्या मूक मोर्चाची ‘मुका मोर्चा’ म्हणून हेटाळणी करणारे ‘सामना’ (शिवसेनेचे मुखपत्र), आरक्षणचे विषय आता नको म्हणणारे शरद पवार आणि वर्षानुवर्षे मराठा समाज केवळ मतपेढी म्हणून पाहणारा काँग्रेस पक्ष."
‘ओबीसी आरक्षणावर मूग गिळून गप्प’

मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे अशी असतानाही,

महाविकास आघाडीचे नेते यावर मूग गिळून गप्प का आहेत, असा सवाल उपाध्ये यांनी केला आहे. ते म्हणाले, “आजही हे तिघेही केवळ राजकारण करू पाहत आहेत. आता या पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, ही भाजपची भूमिका आहे.”

‘देवेंद्र फडणवीस संवेदनशील’
उपाध्ये यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारची बाजू मांडताना, तेच मराठा समाजासाठी सर्वात संवेदनशील असल्याचे म्हटले आहे. "मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण महायुती सरकार असतानाच मिळाले आणि त्याला सर्वोच्च न्यायालयाने सध्या रद्द केले नाही. शिंदे समितीला सहा महिने मुदतवाढ दिली, आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना नोकरी दिली आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळातून मराठा समाजातील एक लाख उद्योजक निर्माण करण्यासाठी 8320 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले," असे त्यांनी नमूद केले.

शेवटी, त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केले की, "महाराष्ट्रातील सामाजिक न्यायाशी द्रोह करणारे या तीन पक्षांचे राजकारण हाणून पाडा!"
या पोस्टमुळे मनोज जरांगे यांच्या आंदोलनादरम्यानच राजकीय वातावरण आणखी तापले आहे.

हेही वाचा: Maratha Reservation Morcha : ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणेने मुंबई दणाणली; मनोज जरांगे आझाद मैदानात दाखल

Share