मंगेशकर रुग्णालयाला पालिकेने बजावली नोटीस
महाराष्ट्र मिरर निलेश राऊत पुणे, २१ मे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डोळ्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान सहावर्षीय मुलीचा मृत्यू झाल्या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णालय प्रशासनाला नोटीस बजावली आहे.
1 min read

महाराष्ट्र मिरर
निलेश राऊत
पुणे, २१ मे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डोळ्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान सहावर्षीय मुलीचा मृत्यू झाल्या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णालय प्रशासनाला नोटीस बजावली आहे. रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान घडलेल्या घटनेबाबत सर्व माहिती, केसपेपर व वैद्यकीय नोंदी २४ तासांच्या आत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सहायक आरोग्याधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी बुधवारी (दि. २०) रोजी रुग्णालय प्रशासनाला नोटीस पाठवली आहे.

प्रियांशी बगाडे (वय ६) हिचा डोळ्यावरील शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्याने पालिकेने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. अशा घटनांमध्ये मुंबई नर्सिंग होम अधिनियम तसेच राज्य शासनाच्या १४ जानेवारी २०२१ च्या अधिसूचनेतील सर्व नियम व सूचनांचे पालन करणे रुग्णालयांसाठी बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाने संबंधित प्रकरणातील संपूर्ण वैद्यकीय कागदपत्रे, उपचार नोंदी आणि शस्त्रक्रियेविषयीचा तपशील आरोग्य विभागाकडे तातडीने सादर करावा, असे आदेश आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत. या प्रकरणी अलंकार पोलिसांकडून तपास सुरू आहे. ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाकडून झालेल्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना देण्यात येणार असल्याचे समजते. मात्र, मुलीच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही. याबाबत शवविच्छेदन अहवालानंतरच अधिक माहिती समोर येणार आहे.
पुणे न्यूज


