महंमदवाडी परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन
वाढत्या लोकसंख्येला सक्षम पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार आणि प्रशासन कटिबद्ध: मुख्यमंत्री
1 min read

वाढत्या लोकसंख्येला सक्षम पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार आणि प्रशासन कटिबद्ध: मुख्यमंत्री
निलेश राऊत
पुणे : पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येला सक्षम पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार आणि प्रशासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महंमदवाडी परिसरातील दोराबजी मॉलजवळ उभारण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन करताना "रोज पाणी, तेही शुद्ध पाणी आणि नियमितपणे पाणीपुरवठा" हा सरकारचा संकल्प असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते प्रभाग ४१ व १९, महंमदवाडी येथील समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाण्याच्या नऊ साठवण टाक्यांचे लोकार्पण व कोनशिला अनावरण समारंभ पार पडला. तसेच मुंढवा येथील महात्मा फुले चौक मेट्रो समवेत दुमजली उड्डाणपुलाचे भूमिपूजन ऑनलाईन झाले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार योगेश टिळेकर, आमदार भीमराव तापकीर, आमदार चेतन तुपे, पुण्याच्या महापौर मंजूषा नागपुरे उपस्थित होते.
टिळेकर यांनी पाठपुरावा केला आणि त्या प्रयत्नांना यश मिळत नागरिकांच्या अनेक वर्षापासूनच्या पाणीप्रश्नाच्या निराकरणासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले गेल्याचे त्यांनी सांगितले.
महंमदवाडी रोड, एन आय बी एम रोड, हांडेवाडी रोड आणि परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा पाण्याच्या टाकीचा प्रकल्प अखेर पूर्णत्वास आला आहे.


