पुण्यातील १,५५४ झाडांची प्रस्तावित कत्तल तात्काळ रद्द करा: मनसे
हा निर्णय नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ असल्याचा आरोप
2 min read

हा निर्णय नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ असल्याचा आरोप
पुणे शहर आधीच वाढत्या प्रदूषण, तापमानवाढ व घटत्या हरितक्षेत्रामुळे त्रस्त आहे. अशा वेळी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्याचा निर्णय घेणे हे केवळ बेजबाबदारपणाचे नव्हे तर नागरिकांच्या भविष्यासोबत खेळण्यासारखे आहे." - साईनाथ बाबर, शहराध्यक्ष, मनसे
निलेश राऊत
पुणे: पुणे महापालिकेच्यावतीने संपूर्ण पुणे शहरामध्ये एप्रिल २०२६ मध्ये तब्बल १,५५४ झाडांची कत्तल करण्याचा प्रस्ताव जाहीर करण्यात आला असून, त्यासंदर्भात हरकती मागविण्यात आल्या आहेत. मात्र हा निर्णय अत्यंत धक्कादायक, पर्यावरणविरोधी व नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा आहे, असा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या निर्णयाविरोधात दंड थोपटले आहेत.

याबाबत मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी गुरुवारी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन झाडांच्या कत्तली करू नये असे निवेदन दिले आहे. याबाबत बाबर यांनी सांगितले की, पुणे शहर आधीच वाढत्या प्रदूषण, तापमानवाढ व घटत्या हरितक्षेत्रामुळे त्रस्त आहे. अशा वेळी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्याचा निर्णय घेणे हे केवळ बेजबाबदारपणाचे नव्हे तर नागरिकांच्या भविष्यासोबत खेळण्यासारखे आहे. झाडे ही केवळ नैसर्गिक संपती नसून, शहराच्या पर्यावरणीय समतोलाची जीवनरेखा आहेत. त्यांची कत्तल म्हणजे पुणे शहराला उष्णतेच्या व प्रदूषणाच्या खाईत ढकलण्याचा प्रयत्न आहे.
बाबर म्हणाले, "झाडेच प्रदूषण आटोक्यात ठेवतात, ऑक्सिजन निर्माण करतात आणि शहराला जगण्यालायक ठेवतात. मात्र, व्यावसायिक प्रकल्पांच्या दबावाखाली महापालिका प्रशासनाने वृक्षतोडीच्या परवानग्या अक्षरशः सर्रास वाटप करण्याचा सपाटा लावला आहे. पुनर्रोपणाच्या नावाखाली केवळ कागदी पूर्तता केली जाते, प्रत्यक्षात ती झाडे जिवंत राहतात का, त्यांची देखभाल होते का, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. हा प्रकार म्हणजे जनतेची उघड फसवणूक आहे.
"विकासप्रकल्पांच्या नावाखाली पर्यावरणाची कत्तल करण्याचा हा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. जर हीच भूमिका प्रशासनाची राहिली, तर पुणे शहर भविष्यात 'काँक्रीटचे जंगल' बनण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे अशा प्रकारे विनाअट आणि बेफिकीरपणे दिल्या जाणाऱ्या वृक्षतोड व पुनर्रोपणाच्या परवानग्यांना आम्ही तीव्र आणि ठाम आक्षेप नोंदवत आहोत. महापालिका प्रशासनाने सदर १,५५४ झाडांची प्रस्तावित वृक्षतोड तात्काळ रद्द करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी पुणे महापालिकेवर राहील," असा इशारा मनसेने दिला आहे.
Immediately cancel the proposed cutting of 1,554 trees in Pune: MNS


