Skip to content

Illegal Construction: पुणे महापालिकेचा बडगा; लोहगाव-खराडीत २१ हजार चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

पुणे, महाराष्ट्र मिरर

DO
Dhanshree Otari

2 min read

Illegal Construction

Illegal Construction: नियमबाह्य प्लॉटिंग व विनापरवाना बांधकामांवर प्रशासनाची कठोर कारवाई; नागरिकांना भूखंड खरेदीत सावध राहण्याचे आयुक्तांचे आवाहन

पुणे, महाराष्ट्र मिरर

Illegal Construction : पुणे महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहिमेला पुन्हा एकदा तीव्र केले आहे. महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या भागांत विनापरवाना आणि नियमबाह्यपणे उभी राहत असलेल्या बांधकामांवर प्रशासनाने मंगळवारी धडक कारवाई केली. लोहगाव आणि खराडी परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने संयुक्त मोहीम राबवून सुमारे २१ हजार ४०० चौरस फुटांचे मोठे आरसीसी बांधकाम बुलडोझरच्या साहाय्याने जमीनदोस्त केले. महापालिकेच्या या कठोर भूमिकेमुळे भूखंड माफिया आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. Illegal Construction lohigao kharadi pmc

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या कडक निर्देशानुसार आणि अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे उपआयुक्त सोमनाथ बनकर यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई पार पडली. मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासूनच या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. लोहगावमधील निंबाळकरनगर (सर्व्हे क्रमांक २९४) तसेच खराडी परिसरातील अनधिकृत बांधकामांना प्रशासनाने लक्ष्य केले. या धडक मोहिमेत बांधकाम विकास विभागाचे अधिकारी आणि स्थानिक अभियंतेही प्रत्यक्ष उपस्थित होते. Illegal Construction

Pune : ‘देवाभाऊंचा निरोप’च्या नावाखाली पुण्यात सुरू आहे कोट्यावधींची लूट

नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये गेल्या काही काळापासून अनधिकृत बांधकामांचे प्रमाण चिंताजनक रित्या वाढले आहे. महापालिकेची कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता, नियमांना बगल देत ही बांधकामे केली जात होती. विशेषतः, प्रशासनाची नजर चुकवण्यासाठी रात्रीच्या वेळी झपाट्याने मजले उभारण्याचे प्रकार वाढल्याचे निदर्शनास आले होते. याची गंभीर दखल घेत आयुक्त नवल किशोर राम यांनी अशा सर्व नियमबाह्य बांधकामांवर तातडीने व कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

काही दिवसांपासून शहरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई मंदावल्याची चर्चा रंगली होती. मात्र, महापालिकेने ही चर्चा फेटाळून लावत पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमबाह्य बांधकामांविरोधातील ही मोहीम आता आणखी वेगाने आणि सातत्याने सुरू राहणार असल्याचे उपआयुक्त सोमनाथ बनकर यांनी स्पष्ट केले आहे.

PMC News : गृहप्रकल्पांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी संबंधित विकसकांचीच

ही कारवाई सुरळीत पार पाडण्यासाठी आणि संभाव्य कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न टाळण्यासाठी महापालिकेने मोठा फौजफाटा तैनात केला होता. यामध्ये दोन पोलीस अधिकारी, १३ पोलीस कर्मचारी, ३५ महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF) जवान यांचा बंदोबस्त होता. तसेच प्रत्यक्षात कारवाईसाठी पाच जेसीबी, सहा गॅसकटर, सात ब्रेकर आणि २५ बिगारी सेवकांची फौज कामाला लावण्यात आली होती. गॅसकटर आणि ब्रेकरच्या साहाय्याने आरसीसी स्ट्रक्चर्स पाडण्याचे काम अत्यंत वेगाने पूर्ण करण्यात आले. Illegal Construction

महापालिकेचे महत्त्वाचे आवाहन
शहराच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या उपनगरांमध्ये काही दलालांकडून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर प्लॉटिंग करून गरिब व मध्यमवर्गीय नागरिकांना स्वस्त भूखंडांचे आमिष दाखवून फसवणूक केली जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अनेक नागरिक कसलीही पडताळणी न करता अशा अनधिकृत भूखंडांची खरेदी करत आहेत. Illegal Construction

भविष्यात नागरिकांची आर्थिक फसवणूक होऊ नये आणि त्यांचे कष्टाचे पैसे वाया जाऊ नयेत, यासाठी महापालिका प्रशासनाने अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. नागरिकांनी कोणतीही जमीन किंवा भूखंड खरेदी करण्यापूर्वी महापालिकेची अधिकृत परवानगी आणि कागदपत्रांची खात्री करावी, तसेच कोणत्याही बेकायदेशीर भूखंडाची किंवा अनधिकृत घराची खरेदी करू नये, असे आवाहन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पुणेकरांना केले आहे. महापालिकेच्या या आक्रमक भूमिकेमुळे भूखंड माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

Share