आपल्या परिसरात अवैध दारूचे अड्डे असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधा
महापौर मंजुषा नागपुरे यांचे आवाहन
2 min read

महापौर मंजुषा नागपुरे यांचे आवाहन
पुणे: आपल्या परिसरात अवैध दारूचे अड्डे असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन महापौर मंजुषा नागपुरे यांनी आज (दि. २९) रोजी केले. हडपसर आणि फुगेवाडी येथे विषारी दारू पिऊन १५ जणांचा मृत्यू झालेल्या घटनेवर नागपुरे यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली.

त्या म्हणाल्या, “खूप वाईट घटना घडली आहे… अत्यंत दु:खद आहे. पुण्यात विषारी दारूमुळे अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. अनेक लोकांचा जीव गेला आहे. मी पुणेकरांना आवाहन करते की, तुमच्या परिसरात अवैध दारू किंवा विषारी दारू तयार करणारे अड्डे असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा. याबाबत मी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा केली आहे. पुण्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालावे.”
‘पुणेकर सुरक्षित आहेत का?’ या प्रश्नावर बोलताना नागपुरे म्हणाल्या, “पुण्याच्या सुरक्षेबाबत मी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली होती. काही दिवसांत परिस्थितीत बदल दिसेल. याबाबत पुन्हा सीपींसोबत चर्चा करावी लागेल. सध्या हा तपासाचा भाग असल्याने अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही.”
सेन्सस सर्वेक्षणावर हल्ल्याच्या घटना दुर्दैवी; जनजागृतीची गरज
जनगणना करण्यास गेलेल्या कर्मचाऱ्यांवर शहरात झालेल्या हल्ल्यासंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या, “सध्या पुण्यात सेन्ससचं काम सुरू आहे. मात्र काही दिवसांपासून गणना करण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना नागरिकांकडून सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. काल कर्मचारी गणनेसाठी गेले असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे.
"माझी सर्वांना विनंती आहे की, या संदर्भात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची गरज आहे. प्रत्येक परिसरात जाऊन नागरिकांना सेन्ससचं महत्त्व समजावून सांगितलं पाहिजे. काही नागरिकांना झोपडपट्टी सर्वेक्षण सुरू असल्याचा गैरसमज झाला असावा. त्यात नवीन नावे समाविष्ट केली जाणार आहेत, असा समज झाल्याने वाद निर्माण झाले असावेत."
दुसऱ्या दिवशी महिला कर्मचारी पुन्हा गणनेसाठी गेल्या असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांना आणि त्यांच्या मुलालाही मारहाण करण्यात आली. अशा घटना थांबवण्यासाठी प्रशासनाने नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. अवेअरनेस कॅम्पेन राबवले पाहिजेत.
महानगरपालिकेचे कर्मचारी विविध कामांसाठी परिसरात जात असताना अनेकदा त्यांच्यावर हल्ल्याच्या घटना घडतात. त्यामुळे याबाबत आम्ही समिती स्थापन करणार आहोत.”
पावसाळी तयारी आणि आचारसंहिता
पावसाळ्यापूर्वीच्या तयारीवर आणि पालखीमार्गावर बोलताना नागपुरे म्हणाल्या, “आचारसंहितेमुळे सध्या मला प्रत्यक्ष ठिकाणी जाता येत नाही. मात्र पावसाळ्यापूर्वीच्या तयारीसंदर्भात मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. पालखी मार्गाच्या पाहणीसाठीही पत्र दिले आहे. आचारसंहितेमुळे आढावा बैठक घेता येत नसली तरी प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी.”


