Skip to content

इंदापूर तालुक्यात पती-पत्नीवर कटरने प्राणघातक हल्ला

शेतजमिनीच्या कौटुंबिक वादातून कारची तोडफोड करत परिसरात माजवली दहशत, ५ जणांवर गुन्हा

PG
Prashik Ghaste

2 min read

इंदापूर तालुक्यात पती-पत्नीवर कटरने प्राणघातक हल्ला

शेतजमिनीच्या कौटुंबिक वादातून कारची तोडफोड करत परिसरात माजवली दहशत, ५ जणांवर गुन्हा

पुणे: इंदापूर तालुक्यातील बंडरवाडी येथील कचरेवस्ती परिसरात शेतजमिनीच्या कौटुंबिक वादातून एका दाम्पत्यावर बेकायदेशीर जमाव जमवून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्लेखोरांनी धारदार कटरचा वापर करत पती आणि पत्नी दोघांनाही कापून गंभीर जखमी केले, तसेच घरासमोर उभी असलेली फिर्यादीची चारचाकी कार दगडाने फोडली.

Photos · 1/1

Arrow Keys ⟵ ⟶

याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात लंकेश दाशा पवार, दाशा जिवड्या पवार (दोन्ही रा. निंबोडी, ता. बारामती), निलेश सोमनाथ भोसले, सौ. बिकी निलेश भोसले (दोन्ही रा. कुंभारगाव, ता. इंदापूर) आणि दीपक मद्रास काळे (रा. कर्जत, जि. अहिल्यानगर) या पाच जणांविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमवून खुनाचा प्रयत्न आणि दंगल घडवल्याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शीतल हनुमंत भोसले (वय २७, व्यवसाय- मासेमारी व शेती, रा. पोंधवडी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १८९(२), १९१(२), १९०, ११८(१), ११५(२), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही थरारक घटना बुधवार (ता. २०) रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास बंडरवाडी येथील कचरेवस्ती परिसरातील शेतजमीन गट क्रमांक १५/१ जवळ घडली.
शेतजमिनीच्या वादातून जमवला जमाव

बेकायदेशीर जमाव जमवला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शीतल भोसले आणि त्यांचे पती हनुमंत भोसले हे मासेमारी व शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. आरोपींसोबत त्यांचा शेतजमिनीवरून जुना कौटुंबिक वाद सुरू आहे. बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शीतल आणि हनुमंत हे कचरेवस्ती येथील शेतात असताना, आरोपींनी जुन्या वादाचा राग मनात धरून बेकायदेशीर जमाव जमवला. त्यांनी फिर्यादी दाम्पत्याला अडवून अश्लील शिवीगाळ करत अचानक हल्ला चढवला.
कटरने केले सपासप वार

पती-पत्नीवर हल्ला
हल्ल्यादरम्यान आरोपी लंकेश पवार याने शीतल भोसले यांच्यावर धारदार कटरने थेट वार केला. हा कटर डाव्या पायाच्या नडगीवर लागल्याने त्या रक्तबंबाळ होऊन खाली कोसळल्या. आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी पती हनुमंत भोसले हे धावून आले असता, दुसरा आरोपी निलेश भोसले याने त्यांच्यावरही कटरने हल्ला चढवला. हा वार हनुमंत यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्यावर लागल्याने ते गंभीर जखमी झाले.

चारचाकी कारची तोडफोड
दोघांना गंभीर जखमी केल्यानंतरही हल्लेखोरांचा राग शांत झाला नाही. त्यांनी घटनास्थळी उभी असलेली फिर्यादी यांची मारुती सुझुकी स्विफ्ट कार (क्रमांक एम.एच. १२ ई.जी. ००५२) दगडाने मारून फोडली. यामध्ये कारच्या काचा फुटून गाडीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जखमी दाम्पत्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून शुक्रवार (ता. २२) रोजी सायंकाळी भिगवण पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस हवालदार मिसाळ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share