Skip to content

लाडक्या बहिणीची फसवणूक करून सरकारची बोगसगिरी: रोहित पवार

लाभार्थी लाडक्या बहिणींची नावे टप्प्याटप्प्याने उडवून योजना बंद करण्याचा हेतू असल्याचा आरोप

PG
Prashik Ghaste

1 min read

लाडक्या बहिणीची फसवणूक करून सरकारची बोगसगिरी: रोहित पवार

लाभार्थी लाडक्या बहिणींची नावे टप्प्याटप्प्याने उडवून योजना बंद करण्याचा हेतू असल्याचा आरोप

प्रतीक्षा पारखी
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शप) चे आमदार रोहित पवार यांनी सोमवार (दि. १) रोजी त्यांच्या समाज माध्यम 'एक्स' हँडलवर एक पोस्ट करून राज्य सरकारवर लाडकी बहीण योजनेवरून टीका केली आहे. ८१ लाख लाभार्थींची नांवे योजनेतून वगळण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसे केल्यास संबंधितांना 'याद राखा' असा इशारा दिला आहे.

आपल्या पोस्टमध्ये पवार म्हणतात, "निवडणुकीपूर्वी २,४७ कोटी लाभार्थी असलेल्या लाडकी बहीण योजनेत या लबाड सरकारने ८१ लाख लाडक्या बहिणींची नावे उडवली आहेत. 'केवायसी'चा फक्त बहाणा आहे, लाभार्थी लाडक्या बहिणींची नावे टप्प्याटप्प्याने उडवून योजना बंद करणे हाच खरा निशाणा आहे.

"आज या लाडक्या बहिणीला बोगस लाभार्थी म्हणणाऱ्या सरकारने निवडणुकीच्या तोंडावर कोणतीही 'केवायसी' न करता योजना राबवली असेल तर ही लाडक्या बहिणीची फसवणूक करून सरकारने केलेली बोगसगिरी नाही का ? लाडक्या बहिणींना कुठल्याही प्रकारे त्रास दिला किंवा पैसे परत घेण्याची भाषा केली तर सरकारला महागात पडेल. त्यामुळे सरकारला या 15000 हजार कोटीची वसुली करायचीच असेल तर मंत्री आणि अधिकाऱ्यांकडून करावी, लाडक्या बहिणीला कुठल्याही प्रकारे त्रास दिला तर याद राखा…!"

मागील आठवड्यात राज्यातील अनेक भागातून योजनेतून नांवें वगळलेल्या शेकडो लाभार्थींनी राज्य महिला व बाल विकास आयुक्तालयात ठिय्या देऊन जाब विचारला होता. त्यांनी असा दावा केला होता की त्यांची काहीही चूक नसताना त्यांना लाभांपासून वंचित ठेवण्यात आले.

Share