Skip to content

इंधन टंचाईवर सरकारचा 'अ‍ॅक्शन प्लॅन'; केरोसीन पुन्हा सुरू करणार, भुजबळांनी विधान परिषदेत सांगितला गॅस वितरणाचा प्राधान्यक्रम

• उत्पादन वाढवण्यावर भर आणि न्यायालयाच्या परवानगीने केरोसीन वाटपाचे संकेत; रुग्णालये व अनाथालयांना मिळणार 100% प्राधान्य

V
Vivek

1 min read

इंधन टंचाईवर सरकारचा 'अ‍ॅक्शन प्लॅन'; केरोसीन पुन्हा सुरू करणार, भुजबळांनी विधान परिषदेत सांगितला गॅस वितरणाचा प्राधान्यक्रम

•उत्पादन वाढवण्यावर भर आणि न्यायालयाच्या परवानगीने केरोसीन वाटपाचे संकेत; रुग्णालये व अनाथालयांना मिळणार 100% प्राधान्य

मुंबई :- इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा 17 वा दिवस असून, याचे तीव्र पडसाद आता महाराष्ट्रातील स्वयंपाकघरात उमटू लागले आहेत. राज्यात निर्माण झालेल्या भीषण गॅस टंचाईवर आणि वाढत्या दरांवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधान परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती दिली. जनतेला दिलासा देण्यासाठी सरकार आता केरोसीन (घासलेट) पुन्हा उपलब्ध करून देण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गॅस दरात वाढ आणि उत्पादनात वाढ

मंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहात माहिती दिली की, युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचे दर वधारले आहेत. व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1720 रुपयांवरून थेट 1835 रुपयांवर पोहोचली आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी बीपीसीएल (BPCL) आणि एचपीसीएल (HPCL) सारख्या कंपन्यांशी चर्चा झाली असून, गॅसचे उत्पादन 9 हजार मेट्रिक टनांवरून 11 हजार मेट्रिक टन इतके वाढवण्यात आले आहे.

गॅस सिलिंडर वितरणाचा नवा प्राधान्यक्रम

घरगुती वापराच्या सिलिंडरची गरज पूर्ण केल्यानंतर, शिल्लक राहणाऱ्या गॅसचे वाटप कसे करावे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एक नियमावली तयार केली आहे:

100% प्राधान्य: रुग्णालये, शैक्षणिक संस्था, स्मशानभूमी आणि अनाथालये.

70% प्राधान्य: संरक्षण क्षेत्र, पोलीस, हवाई वाहतूक आणि रेल्वे स्थानकांवरील उपहारगृहे.

50% प्राधान्य: औषध निर्मिती उद्योग.

केरोसीन (घासलेट) पुन्हा मिळणार?

उज्ज्वला गॅस योजनेमुळे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार केरोसीन बंद करण्यात आले होते. मात्र, सध्याची आणीबाणीची स्थिती पाहता, राज्य सरकार पुन्हा एकदा उच्च न्यायालयाला विनंती करणार आहे. न्यायालयाची परवानगी मिळताच सरकारी पंपांवर केरोसीन उपलब्ध करून दिले जाईल, जेणेकरून गॅसला पर्याय म्हणून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा वापर करता येईल.

हॉटेल व्यवसायाला फटका

व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्याने आणि पुरवठा विस्कळीत झाल्याने हॉटेल व्यवसायावर गंभीर परिणाम झाला आहे. घरगुती ग्राहकांना सबसिडीचे तीन सिलिंडर वेळेवर देण्याचा प्रयत्न सरकार करत असून, नागरिकांनी संयम बाळगावा असे आवाहनही भुजबळ यांनी केले आहे.

हेही वाचा: Ritu Tawade : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ; आता 3 ऐवजी 6 अंगरक्षकांचा गराडा

Share