Skip to content

Gas Cylinder : गॅस टंचाईवरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने! "तुटवडा लवकरच सुटेल", मंत्री योगेश कदम यांचा दिलासा; तर आदित्य ठाकरेंनी केंद्राला धरले धारेवर

LPG Gas Cylinder Problem : युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम; मुख्यमंत्र्यांचे परिस्थितीवर बारीक लक्ष, 'युवासेना' प्रमुखांची अधिकृत स्पष्टीकरणाची मागणी

V
Vivek

1 min read

Gas Cylinder : गॅस टंचाईवरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने! "तुटवडा लवकरच सुटेल", मंत्री योगेश कदम यांचा दिलासा; तर आदित्य ठाकरेंनी केंद्राला धरले धारेवर

LPG Gas Cylinder Problem : युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम; मुख्यमंत्र्यांचे परिस्थितीवर बारीक लक्ष, 'युवासेना' प्रमुखांची अधिकृत स्पष्टीकरणाची मागणी

मुंबई :- इराण-इस्रायल संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक ऊर्जा संकटाचे पडसाद महाराष्ट्रात तीव्रतेने उमटत आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे मुंबईतील हॉटेल उद्योग कोलमडण्याच्या स्थितीत असतानाच, आता या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री योगेश कदम यांनी सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे, तर आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे स्पष्टीकरण मागत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

"गल्फमधील साठा पोहोचलाय, घाबरू नका" - योगेश कदम

हॉटेल बंद होत असल्याच्या वृत्तावर भाष्य करताना मंत्री योगेश कदम म्हणाले की, "अशी कोणतीही उदाहरणे अद्याप आमच्यासमोर आलेली नाहीत. केंद्र सरकारने व्यावसायिक गॅसबाबत काही खबरदारीचे निर्णय घेतले असले, तरी घरगुती गॅसबाबत कोणतीही अडचण नाही. आखाती देशांतून (Gulf Countries) येणारा गॅसचा साठा आपल्याला प्राप्त झाला असून, हा प्रश्न लवकरच सुटेल. मुख्यमंत्री स्वतः या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही."

आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर निशाणा

दुसरीकडे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी 'X' (ट्विटर) वर पोस्ट करत केंद्र सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "आखाती देशातील युद्धाचा आपल्या देशातील जनतेच्या दैनंदिन जीवनावर आणि अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम होणार आहे, याची अधिकृत माहिती केंद्र सरकारने जनतेला द्यायला हवी. सामान्य माणसाला कोणत्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे, हे स्पष्ट करणे सरकारचे कर्तव्य आहे," असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.

ग्राउंड रिपोर्ट: हॉटेल उद्योग धास्तावला

मंत्र्यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे म्हटले असले तरी, व्यावसायिक स्तरावर वेगळे चित्र पाहायला मिळत आहे:

आहार (AHAR) संघटनेचा दावा: गॅसअभावी मुंबईतील 10 ते 20 टक्के हॉटेल्सनी 'शटर' ओढले असून, आगामी ३ दिवसांत पुरवठा न झाल्यास अर्धी मुंबई हॉटेलमुक्त होईल, अशी भीती आहे.

घरगुती ग्राहकांत चिंता: व्यावसायिक गॅसवरील निर्बंधांमुळे घरगुती गॅसचा पुरवठाही बाधित होईल का, या चिंतेने ग्राहकांनी बुकिंगसाठी रांगा लावल्या आहेत.

Share