शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने ५२ लाखांची फसवणूक
नऱ्हे येथील महिलेला ‘ऐक्य’ अॅपच्या माध्यमातून लुटले
1 min read

नऱ्हे येथील महिलेला ‘ऐक्य’ अॅपच्या माध्यमातून लुटले
पुणे: शेअर बाजारातील 'आयपीओ’मध्ये (IPO) गुंतवणूक केल्यास कमी श्रमात मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून नऱ्हे परिसरातील एका ४६ वर्षीय महिलेची ५२ लाख ७२ हजार ४७७ रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. ‘ऐक्य’ (Aikya) नावाचे बनावट ट्रेडिंग अॅप डाऊनलोड करण्यास सांगून सायबर चोरट्यांनी हा डल्ला मारला असून, याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नऱ्हे परिसरात राहणाऱ्या एका ४६ वर्षीय महिलेने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. ही घटना ३० जानेवारी ते २ एप्रिल २०२६ या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडली. अज्ञात सायबर चोरट्यांनी फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसंदर्भात एक जाहिरात पाठवली होती. “कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त नफा (Profit) मिळेल,” असे सांगून चोरट्यांनी महिलेचा विश्वास संपादन केला.
चोरट्यांनी महिलेला एक लिंक पाठवून त्याद्वारे ‘ऐक्य’ नावाचे ट्रेडिंग अॅप इन्स्टॉल करण्यास सांगितले. सुरुवातीला महिलेला कमी रक्कम गुंतवून शेअर्स आणि आयपीओ खरेदी करण्यास भाग पाडले. विश्वास बसण्यासाठी चोरट्यांनी त्यांना सुरुवातीला काही परतावा मिळवून दिला. अधिक नफ्याच्या आमिषाने महिलेने वेळोवेळी एकूण ५२ लाख ७२ हजार ४७७ रुपये आरोपींनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांवर भरले. मात्र, जेव्हा त्यांनी नफा आणि गुंतवलेली रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा चोरट्यांनी ती देण्यास नकार देत संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
सायबर पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१९(२), ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार अज्ञात मोबाईल धारक आणि लिंक वापरकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सोशल मीडियावरील जाहिरातींना किंवा अनधिकृत ट्रेडिंग अॅप्सना बळी पडू नका, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
Fraud of Rs 52 lakhs on the pretext of investment in the stock market


