शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली १.४० कोटींची फसवणूक, आरोपीला सातारा येथून अटक
अॅपवर गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवले
1 min read

अॅपवर गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवले
पुणे: शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून तब्बल १ कोटी ४० लाख १६ हजार ३१५ रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला पुणे शहर सायबर पोलिसांनी अटक केली आहे. सुशांत हनमंत निकम (वय ३८, रा. अपसिंगे, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणातील फिर्यादीशी आरोपींनी व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधला होता. 'टायकुन कॉईन' कंपनीच्या ट्रेडिंग अॅपवर गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे आमिष त्यांना दाखवण्यात आले. या प्रलोभनाला बळी पडून फिर्यादीने विविध बँक खात्यांमध्ये वेळोवेळी मोठी रक्कम जमा केली. मात्र, कोणताही परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी सायबर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.
तपासाची चक्रे आणि अटक
सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले असता, फसवणुकीच्या रक्कमेपैकी १ लाख रुपये सुशांत निकम याच्या आयडीबीआय (IDBI) बँक खात्यावर जमा झाल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे पुणे सायबर पोलिसांचे पथक सातारा येथे रवाना झाले. तेथून आरोपीला ताब्यात घेऊन २९ एप्रिल २०२६ रोजी अटक करण्यात आली. आरोपीकडून एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून, या गुन्ह्यात आणखी कोणाचे हात गुंतले आहेत याचा तपास पोलीस करत आहेत.
नागरिकांना आवाहन
पुणे सायबर पोलिसांनी या निमित्ताने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. शेअर ट्रेडिंगमध्ये अवास्तव परताव्याच्या आमिषाला बळी पडू नका. डिजिटल अटक, पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगून होणारे कॉल किंवा केवायसी (KYC) अपडेट करण्याच्या धमक्यांना घाबरू नका. असा कोणताही संशयास्पद प्रकार घडल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.
ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस निरीक्षक संगीता देवकाते आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


