देहूरोड सामूहिक बलात्कार प्रकरणी चौघांना ‘दुहेरी जन्मठेप’
पिंपरी: देहूरोड परिसरात २०२१ मध्ये एका तरुणीवर झालेल्या अमानवीय सामूहिक बलात्कार प्रकरणाचा निकाल लागला असून, पुणे सत्र न्यायालयाने चारही नराधमांना ‘दुहेरी जन्मठेपेची’ ऐतिहासिक शिक्षा सुनावली आहे.
1 min read

पिंपरी: देहूरोड परिसरात २०२१ मध्ये एका तरुणीवर झालेल्या अमानवीय सामूहिक बलात्कार प्रकरणाचा निकाल लागला असून, पुणे सत्र न्यायालयाने चारही नराधमांना ‘दुहेरी जन्मठेपेची’ ऐतिहासिक शिक्षा सुनावली आहे.

नोमान ऊर्फ अरबाज जावेद खान, सुलतान ऊर्फ मुश्ताख सलिम सय्यद, रियाज ऊर्फ मन्नन जोवद खान, सोहेल शेरअली पिरझादे अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. या सर्वांना गुन्ह्यात दोषी ठरवून मरेपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
लांच्छनास्पद कृत्याचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केले
२०२१ मध्ये आरोपींनी संगनमत करून एका तरुणीला जाळ्यात ओढले होते. आरोपींनी केवळ तिच्यावर सामूहिक बलात्कार केला नाही, तर त्या कृत्याचे अश्लील व्हिडिओ तयार करून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवून आरोपींनी पीडितेवर वारंवार अत्याचार केले. तसेच पीडितेवर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले.
जीवे मारण्याची धमकी, शारीरिक आणि मानसिक छळ
तक्रार केल्यास संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी देऊन तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईकपाटील यांनी अत्यंत बारकाईने केला होता. देहूरोड पोलिसांनी केवळ साक्षीदारांवर अवलंबून न राहता तांत्रिक आणि वैद्यकीय पुराव्यांची भक्कम साखळी न्यायालयात सादर केली.
अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पाटील यांनी सरकारी पक्षातर्फे मांडलेला युक्तिवाद आणि पोलिसांनी सादर केलेले पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपींना कठोर शिक्षा सुनावली.
आरोपींविरुद्ध देहूरोड पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार, आयटी ॲक्ट (अश्लील व्हिडिओ बनवणे/धमकावणे), ॲट्रॉसिटी ॲक्ट (अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा) या कलमान्वये गुन्हे दाखल होते.


