Skip to content

आंबेगाव पठार येथे पाच अल्पवयीन मुलांनी केला १८ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून

दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा रागातून घडले कृत्य

PG
Prashik Ghaste

1 min read

आंबेगाव पठार येथे पाच अल्पवयीन मुलांनी केला १८ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून

दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा रागातून घडले कृत्य

पुणे: आंबेगाव पठार येथील नीलगिरी चौकात दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका १८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. लोखंडी धारदार शस्त्राने वार करून आणि डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून या तरुणाला जिवे ठार मारण्यात आले. या भीषण घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, भारती विद्यापीठ पोलिसांनी याप्रकरणी पाच अल्पवयीन मुलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

नयन सचिन जाधव (वय १८, रा. आंबेगाव पठार, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नयनच्या ४४ वर्षीय आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात सहभागी असलेल्या पाच मुलांपैकी चार विधिसंघर्षित बालकांना (अल्पवयीन) ताब्यात घेतले असून, एक जण अद्याप फरार आहे.

दोन दिवसांपूर्वीच्या भांडणाचा बदला
मिळालेल्या माहितीनुसार, मयत नयन आणि आरोपी मुलांमध्ये दोन दिवसांपूर्वी काही कारणावरून कडाक्याचे भांडण झाले होते. याच भांडणाचा बदला घेण्याच्या उद्देशाने सोमवारी (ता. ४) रात्री सव्वा नऊच्या सुमारास आरोपींनी नीलगिरी चौकात नयनला गाठले. आरोपींनी पूर्वतयारी करून सोबत लोखंडी शस्त्रे आणली होती.

शस्त्राने वार करून डोक्यात घातला ब्लॉक
आरोपींनी नयनवर लोखंडी धारदार हत्याराने डोक्यावर वर्मी घाव घातले. नयन खाली पडल्यानंतर आरोपींनी अत्यंत क्रूरपणे तिथे असलेला सिमेंटचा जड ब्लॉक त्याच्या डोक्यात मारला. या भीषण हल्ल्यात नयन गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. भरवस्तीत आणि वर्दळीच्या चौकात ही घटना घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

भारती विद्यापीठ पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ३(५) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ नुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Share