Skip to content

सिंहगड रोड परिसरात गोळीबार: पाच विधीसंघर्षित बालक ताब्यात; पिस्टल व कोयते जप्त

जुन्या वादातून एका इसमावर हल्ला; पोलिसांची तत्पर कारवाई, मोठा अनर्थ टळला

PG
Prashik Ghaste

1 min read

सिंहगड रोड परिसरात गोळीबार: पाच विधीसंघर्षित बालक ताब्यात; पिस्टल व कोयते जप्त


जुन्या वादातून एका इसमावर हल्ला; पोलिसांची तत्पर कारवाई, मोठा अनर्थ टळला

पुणे: सिंहगड रोड परिसरात जुन्या भांडणाच्या रागातून एका इसमावर लोखंडी हत्याराने हल्ला करून पिस्टलमधून गोळीबार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून या प्रकरणी पोलिसांनी पाच विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून एक पिस्टल आणि दोन लोखंडी कोयते जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.


दि. ७ एप्रिल रोजी रात्री सुमारे ११.४५ वाजण्याच्या सुमारास चरवडवस्ती, वडगाव बुद्रुक येथे काही जणांनी जुन्या वादातून एका इसमाला लक्ष्य करत लोखंडी हत्याराने मारहाण केली. यावेळी त्याच्याकडील पिस्टलमधून गोळीबार झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ तपास सुरू करण्यात आला. दि. ८ एप्रिल रोजी सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर आणि तपास पथक आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, संबंधित आरोपी शरद हॉस्पिटल ते प्रयोजा सिटी रोड परिसरात थांबले आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचला.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पाठलाग करून त्यांना पकडण्यात आले. चौकशीदरम्यान हे सर्वजण विधीसंघर्षित बालक असल्याचे निष्पन्न झाले. पंचासमक्ष घेतलेल्या अंगझडतीत त्यांच्या ताब्यातून एक पिस्टल आणि दोन लोखंडी कोयते आढळून आले. त्यानंतर सर्वांना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे करत असून या कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, अल्पवयीन मुलांकडून अशा प्रकारे अग्निशस्त्राचा वापर केल्यामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) समीर गायकवाड यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे, पोलीस उपनिरीक्षक भुपेश सांळुके, संतोष भांडवलकर तसेच पोलीस अंमलदारांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या केली.

Firing in Sinhagad Road area

Share