इंदापुरात कंत्राटदारावर प्राणघातक हल्ला
‘फॉरच्युनर’ मधून आलेल्या टोळक्याचा राडा; दोन गटांतील वाद
2 min read

‘फॉरच्युनर’ मधून आलेल्या टोळक्याचा राडा; दोन गटांतील वाद
पुणे: इंदापूर तालुक्यातील राजवडी चौकात शनिवारी रात्री दोन गटांत झालेल्या वादातून एका शासकीय कंत्राटदारावर कोयता आणि तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. आरोपीने फिर्यादीच्या गळ्यावर कोयता चालवून जिवे मारण्याचा प्रयत्न केला, मात्र हा वार थोडक्यात चुकल्याने अनर्थ टळला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रोहित नाना भिसे (वय २५, व्यवसाय शासकीय कंत्राटदार, रा. राजवडी, ता. इंदापूर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अभिमन्यू ऊर्फ आबा मारोती कोकणे, तुषार ऊर्फ मंट्या बापू कोकणे, अक्षय बापू कोकणे (सर्व रा. राजवडी) आणि दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
भावाच्या भांडणातून झाला हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित यांचा भाऊ ऋषिकेश आणि तुषार कोकणे यांच्यात शनिवारी (ता. २) रात्री माउली किराणा दुकानासमोर भांडण झाले होते. या भांडणाची माहिती मिळताच रोहित राजवडी चौकात पोहोचला. तिथे ते थांबलेले असतानाच एक पांढऱ्या रंगाची फॉरच्युनर कार वेगात आली आणि त्यांच्या समोर थांबली.
गळा कापण्याचा प्रयत्न, कोयता-तलवारीने केले वार
गाडीतून खाली उतरलेल्या आरोपींपैकी अभिमन्यू कोकणे याने रोहितला उद्देशून “तुला मारायचे आहे,” असे म्हणत हातातील कोयता थेट त्यांच्या गळ्यावर चालवला. रोहित यांनी तत्परतेने मान बाजूला केल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र, त्यानंतर तो पळून जात असताना आरोपींनी त्याला गाठले आणि डोक्यावर कोयता व तलवारीने जोरदार वार करून गंभीर जखमी केले. रोहित खाली पडल्यानंतर अक्षय कोकणे आणि इतर दोघांनी लोखंडी गजाने हात, पाय, खांदा आणि पाठीवर अमानुषपणे मारहाण केली.
नागरिकांच्या मदतीमुळे वाचला जीव
“तुम्हा दोन्ही भावांना जिवंत सोडणार नाही, तुम्हाला संपवून टाकू,” अशी धमकी देऊन आरोपी तिथून पसार झाले. या भीषण हल्ल्यानंतर घटनास्थळी असलेल्या अनिल बापू पुणेकर आणि रितेश अनिल पुणेकर यांनी रोहितला तातडीने दुचाकीवरून लोणी देवकर येथील इंद्रेश्वर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
इंदापूर पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० आणि शस्त्र कायदा कलम ४, २५ नुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार मोरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


