Skip to content

कोंढव्यात बांधकाम व्यावसायिकाकडून १५ लाखांची खंडणी

पालिकेच्या कारवाईच्या नावाखाली धमक्या, दबाव आणि गुंडगिरी; ४ जणांविरुद्ध गुन्हा

PG
Prashik Ghaste

1 min read

कोंढव्यात बांधकाम व्यावसायिकाकडून १५ लाखांची खंडणी

पालिकेच्या कारवाईच्या नावाखाली धमक्या, दबाव आणि गुंडगिरी; ४ जणांविरुद्ध गुन्हा

आरोपींवर यापूर्वीही कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये खंडणीसह विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याचा उल्लेख तक्रारीत आहे

पुणे: कोंढवा परिसरात बांधकाम व्यावसायिकांना आणि जमीन मालकांना धमकावून, पुणे महानगरपालिकेकडे खोट्या तक्रारी करून बांधकामे बंद पाडण्याची भीती दाखवत लाखो रुपयांची खंडणी उकळणारे रॅकेट सक्रिय असल्याचा प्रकार समोर आला आहे.

हडपसर येथील लेबर कॉन्ट्रॅक्टर अकबर मेहबूब खान यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत गंभीर आरोप करत म्हटले आहे की, कोंढवा खुर्द येथील त्यांच्या मालकीच्या जागेवरील बांधकाम थांबवण्यासाठी काही व्यक्तींनी संगनमत करून पुणे महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या आणि कारवाई घडवून आणली.

तक्रारीनुसार, शफी गुलजारखान पठाण, समीर शफी पठाण, साजिद हसन शेख आणि कमल नितीन खैरनार यांनी “काम सुरू ठेवायचे असेल तर पैसे द्यावे लागतील” अशी उघड धमकी दिली. सुरुवातीला १० लाख रुपये, कमल खैरनार यांच्यासाठी ५ लाख रुपये आणि एका २बीएचके]फ्लॅटची मागणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारदाराने भीतीपोटी वेळोवेळी रोख स्वरूपात तब्बल १५ लाख रुपये दिल्याचा दावा केला आहे. मात्र, तरीही बांधकामावर वारंवार महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. “आमचे महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध आहेत, तुमचे अधिकृत बांधकाम देखील बेकायदेशीर दाखवून पाडू शकतो,” अशा धमक्या आरोपींकडून दिल्या गेल्याचे तक्रारीत नमूद आहे.

आरोपींवर यापूर्वीही कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये खंडणीसह विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, बांधकाम व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोंढव्यात सुरू असलेल्या या खंडणी आणि दहशतीच्या राजकारणाला आळा बसणार का?” असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Extortion of Rs 15 lakhs from a construction worker in Kondhwa

Share