Skip to content

खेड तालुक्यात टोळीयुद्धातून डंपरने गाड्या चिरडल्या

हॉटेलसमोर थरार, कोयत्याने वार करून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

PG
Prashik Ghaste

3 min read

खेड तालुक्यात टोळीयुद्धातून डंपरने गाड्या चिरडल्या

हॉटेलसमोर थरार, कोयत्याने वार करून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे: जुने वाद आणि पोलीस तक्रार केल्याचा राग मनात धरून सात ते आठ जणांच्या टोळीने हॉटेलसमोर बसलेल्या तरुणांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना खेड तालुक्यातील रेटवडी येथे घडली आहे. आरोपींनी ‘टाटा हायवा’ डंपर थेट फिर्यादीच्या कारवर घालून ती चिरडली, तसेच इतर चार ते पाच वाहनांना जोरात धडक देऊन मोठे नुकसान केले.

Photos · 1/1

Arrow Keys ⟵ ⟶

यानंतर आरोपींनी तरुणाला बेदम मारहाण करून कोयत्याने डोक्यात वार करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी खेड पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून इतर तीन अनोळखी इसमांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत प्रमोद रघुनाथ हिंगे (वय २८, धंदा- शेती व व्यवसाय, रा. रेटवडी, ता. खेड, जि. पुणे) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी अशोक कांदू रेटवडे, दर्शन मच्छिंद्र काळे, संकेत कांताराम दुबे, प्रणाल नवनाथ पवळे (सर्व रा. रेटवडी, ता. खेड, जि. पुणे), प्रवीण प्रकाश रामाणे (रा. दावडी, ता. खेड, जि. पुणे) आणि इतर ३ अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०९(१), १८९(२)(४), १९१(२)(३), ३५२, ३५१(२) नुसार खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही थरारक घटना बुधवार (ता. २०) रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास रेटवडी गावच्या हद्दीतील 'हॉटेल दर्शन’च्या शेडमध्ये आणि वाहनतळावर (पार्किंग) घडली.

’गोरखवर तक्रार का केली?’ यावरून वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमोद हिंगे आणि त्यांचा मित्र अमोल काळे हे हॉटेल दर्शनच्या शेडमध्ये बसले होते. यावेळी आरोपी अशोक रेटवडे, दर्शन काळे, संकेत दुबे, प्रणाल पवळे आणि प्रवीण रामाणे हे त्यांच्या ताब्यातील ‘टाटा हायवा’ (क्रमांक एम.एच. १४ एच.जी. ७०७०) आणि एका निळ्या रंगाच्या विना-बॉडीच्या ‘इंट्रा’ गाडीतून तिथे आले. “तू गोरख म्हसाडे याच्यावर पोलीस ठाण्यात तक्रार का दिलीस?” असा जाब विचारत आरोपींनी अमोल काळे याला अर्वाच्च शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली.

हायवा डंपरने कार चिरडल्या; वाहनांचे प्रचंड नुकसान
वादाचे रूपांतर गंभीर हाणामारीत झाले. आरोपी अशोक रेटवडे व प्रवीण रामाणे यांनी ‘इंट्रा’ गाडीतून लाकडी दांडके काढून अमोल याच्या डोक्यात, पाठीवर आणि पायावर बेदम मारण्यास सुरुवात केली. याच वेळी आरोपी दर्शन काळे आणि संकेत दुबे हे त्यांच्या ‘हायवा’ डंपरकडे धावले. दर्शन काळे याने हायवा डंपर वेगाने चालवून हॉटेलच्या पार्किंगमध्ये उभी असलेली अमोल काळे यांची ‘ह्युंदाई व्हर्ना’ कार आणि वैभव साबळे यांची ‘टाटा हॅरियर’ कार यांना तीन वेळा जोरात धडक देऊन चिरडले.

एवढ्यावरच न थांबता त्याने पार्किंगमधील इतर चार ते पाच वाहनांना (ज्यात हुंदाई आय-२० कारचा समावेश आहे) जोरदार धडक देऊन वाहनांचे मोठे नुकसान केले. त्यानंतर त्याने अमोल काळे याला जिवे मारण्याच्या उद्देशाने थेट हायवा डंपर त्याच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.

कोयत्याने डोके फोडले; बेशुद्ध पडल्यावर दिली जिवे मारण्याची धमकी
डंपरच्या हल्ल्यातून अमोल काळे सुदैवाने वाचला. मात्र, त्यानंतर आरोपी अशोक रेटवडे व प्रवीण रामाणे यांनी गाडीतून कोयता आणि विळा काढून अमोलवर सपासप वार केले. अशोकने कोयत्याने अमोलच्या डोक्यात जोरात वार केल्याने तो रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळला. त्यानंतर तेथे आलेल्या इतर अनोळखी इसमांनी अमोलला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, ज्यामुळे तो जागीच बेशुद्ध पडला.

अमोल बेशुद्ध पडल्यानंतर आरोपी अशोक रेटवडे हा टाटा हॅरियर गाडीच्या बोनेटवर उभा राहिला आणि आरडून ओरडून म्हणाला, “गोरख म्हसला हात लावला तर अशीच अवस्था होईल.” तसेच “अमोल काळेसोबत जो कोणी राहील, त्यालाही आम्ही संपवून टाकू,” अशी धमकी देऊन आरोपी परिसरात दहशत माजवून पसार झाले.

या घटनेनंतर रेटवडी परिसरात कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. जखमी अमोल काळे याला रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. खेड पोलिसांनी आरोपींवर प्राणघातक हल्ल्याचा गंभीर गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू केली आहे.

पोलीस उपनिरीक्षक गरड या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

पुणे क्राईम न्युज

Share