Skip to content

बावधन येथील 'पी जी १३' खेळाचे मैदान खुले करण्याची मागणी

'आप'कडून ७ मे रोजी दुपारी चार वाजता “ताळा तोड आंदोलन” ची घोषणा

PG
Prashik Ghaste

1 min read

बावधन येथील 'पी जी १३' खेळाचे मैदान खुले करण्याची मागणी

'आप'कडून ७ मे रोजी दुपारी चार वाजता “ताळा तोड आंदोलन” ची घोषणा

निलेश राऊत
पुणे: बावधन येथील 'पी जी १३' हे सार्वजनिक मैदान महापालिकेच्या ताब्यात असूनही नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. सार्वजनिक वापरासाठी असलेली ही जागा दीर्घकाळ कुलूपबंद राहिल्यामुळे परिसरातील मुलांना खेळण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होत नाहीत.

या संदर्भात क्रीडा विभाग प्रमुख, इस्टेट विभाग प्रमुख तसेच महापालिका आयुक्तांना डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत वारंवार लेखी पाठपुरावा करून सर्व कागदपत्रे सादर करण्यात आली. मैदान खुले करण्याची मागणी सातत्याने करण्यात आली; मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. मार्च महिन्यातील पाठपुराव्यादरम्यान महापालिकेमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आयुक्तांना चुकीची माहिती दिल्याचे निदर्शनास आले असून, त्यामुळे निर्णय प्रक्रियेची दिशाभूल झाल्याची बाब समोर आली आहे. तसेच, संबंधित आयुक्तांची बदली झाल्याने प्रश्न प्रलंबित आहे.

या पार्श्वभूमीवर, आम आदमी पक्षाच्या वतीने स्थानिक नागरिकांसह “ताळा तोड आंदोलन” करण्याची घोषणा करण्यात आली आहे. अशी माहिती पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा आरती करंजवणे यांनी दिली. हे आंदोलन येत्या ७ मे रोजी दुपारी चार वाजता होणार आहे.

करंजवणे म्हणाल्या परिसरातील मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध नसणे ही गंभीर बाब आहे आणि सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही मैदान खुले होत नसल्यास नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे.

पुणे शहर उपाध्यक्ष ॲड. कृणाल घारे यांनी नमूद केले की, संबंधित जमिनीचा ताबा महापालिकेकडे असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट आहे. या संदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही झालेली नाही. चुकीची माहिती देण्यात आल्याची बाबही संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने मैदान तात्काळ खुले करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, सदर आंदोलनात स्थानिक नागरिक, पालक व रहिवाशांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Demand to open 'PG 13' playground at Bavdhan

Share