Crime Newsजुन्या वादातून मोबाईल व्यावसायिकावर हल्ला; चोवीस तासात सहा आरोपी अटकेत
पुणे, महाराष्ट्र मिरर Crime News: कोथरूड परिसरात मोबाईल व्यावसायिकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक-१ ने अवघ्या चोवीस तासांत कारवाई करत सहा आरोपींना अटक केली आहे.
1 min read

अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांचाही समावेश
पुणे, महाराष्ट्र मिरर Crime News: कोथरूड परिसरात मोबाईल व्यावसायिकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक-१ ने अवघ्या चोवीस तासांत कारवाई करत सहा आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांचाही समावेश आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर, पोलिस तपासादरम्यान या हल्ल्यामागे जुन्या वादातून व्यावसायिकाच्या खुनाची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले.Crime News

सिद्धेश नितीन धुमाळ (वय २५, रा. घोरपडे पेठ, पुणे), नागेश उर्फ लाडू राजू माणिके (वय १९), राज तुषार धुमाळ (वय १९), प्रसाद सुभाष मारणे, आदित्य अश्विनीकुमार डाके, मेघराज ज्ञानेश्वर बारंगळे यांना अटक करण्यात आली आहे. तसेच, दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
कोथरूड परिसरातील कर्वे रोड येथे १४ जुलै रोजी मोबाईल व्यावसायिकावर लोखंडी कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना मुख्य आरोपी सिद्धेश धुमाळ हा घोरपडे उद्यान परिसरात लपल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीदरम्यान त्याने या गुन्ह्यातील आपल्या वरिल साथीदारांची नावे उघड केली. या सहा आरोपींना अटक केल्यानंतर, या प्रकरणातील दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक-१ चे पोलीस निरीक्षक महेश सागडे, पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जाधव यांच्यासह पथकाने केली.


