गुन्हे शाखेने खुनाचा कट उधळला, तीन जणांना अटक
तलवारी, कारसह दोन लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त
2 min read

तलवारी, कारसह दोन लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त
पुणे: पूर्ववैमनस्य आणि संशयितावर गुन्हे दाखल केल्याचा बदला घेण्यासाठी पुरंदर तालुक्यातील दोन जणांच्या हत्येचा कट रचणाऱ्या तीन संशयितांना वेळीच ताब्यात घेवुन पोलिसांनी खुनाचा कट उध्वस्त केला आहे. या गुन्हयात तीन जणांना अटक करून दोन लाख २२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

गुन्हे शाखा युनिट ७ कडील पथक मागील आठवड्यात गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार निलेश साळवे व प्रशांत कापुरे यांना मिळालेल्या एका गोपनीय बातमीवरून प्रकाश ऊर्फ दीपक शंकर चव्हाण (वय २४ वर्षे, रा. लोहगाव) यास ताब्यात घेवुन त्याच्या अल्टो कार मधुन धारदार हत्यारे जप्त करण्यात आले.
त्यानंतर युनिट ७ प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे व सपोनी मदन कांबळे यांनी त्यांच्या एका पथकासह संशयितांची सखोल चौकशी केली असता सदरची हत्यारे व कार त्याचा मित्र अनिकेत रामचंद्र चव्हाण (वय २५ वर्षे, रा. विर, ता. पुरंदर, सध्या रा. वैदुवाडी व त्याचा आणखी एक साथीदार याने पुरवली होती.
चव्हाण याचे मांडकी, ता. पुरंदर येथील राहणाऱ्या दोन इसमांबरोबर पूर्वीचे भांडण होते व त्याच्याविरूद्ध दाखल केलेल्या गुन्हयाचा बदला घेण्यासाठी चव्हाणचा साथिदार आकाश दिपक धनवटे ऊर्फ भावडी (वय २० वर्षे रा. लोहगाव) याच्यासह सर्वांनी मिळुन हत्येचा कट रचला असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
चव्हाण यास ताब्यात घेवुन त्याच्या घराची झडती घेतली असता दोन तलवारी, बेस बॉल स्टीक व लाकडी दांडके जप्त करण्यात आले. सर्व संशयितांवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ५५,६१ व भा. हत्यार कायदा कलम ४ (२५), व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (२) (३) सह १३५ प्रमाणे लोहगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगीरी अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त विवेक मासाळ, सहा. पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ७ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या सुचनांप्रमाणे स.पो.नि. मदन कांबळे, पोलीस अंलदार सारंग दळे, गिरीष नाणेकर, निलेश साळवे, प्रशांत कापुरे, विनायक साळवे, निर्णय लांडे, ऋषीकेश ताकवणे, सुहास तांबेकर, भरत गुंडवाड, नितीन धाडगे, किरण पलांडे, समाधान पाटील, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे, सोनाली नरवडे यांच्या पथकाने केली.


