बारामतीत दाम्पत्याला ४ लाखांचा गंडा
स्वामी विवेकानंद संस्थेत ‘लिपिक’ पदाचे दाखवले आमिष
1 min read

स्वामी विवेकानंद संस्थेत ‘लिपिक’ पदाचे दाखवले आमिष
बारामती: एका नामांकित शिक्षण संस्थेत स्वतःला आणि पत्नीला ‘लिपिक’ (क्लार्क) पदावर नोकरी मिळेल, या आशेने पैसे भरणाऱ्या बारामतीतील एका व्यक्तीची ४ लाख ११ हजार ५०० रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. नोकरीचे खोटे आमिष दाखवून पैसे उकळणाऱ्या बारामती आणि सातारा येथील दोन एजंटांविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल महादेव क्षीरसागर (वय ३९, रा. तांदळवाडी, ता. बारामती) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, विक्रम रवींद्र कदम (रा. बारामती) आणि रूपचंद्र तुकाराम साबळे (रा. शिवथर, जि. सातारा) या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१८(४) आणि ३(५) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल क्षीरसागर हे बारामतीमध्ये महा ई-सेवा केंद्र चालवतात. आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन करून “स्वामी विवेकानंद संस्थेत आम्ही तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला 'लिपिक' या पदावर नोकरी लावून देतो,” असे खोटे आश्वासन दिले. या आमिषाला बळी पडून फिर्यादींनी १३ जून २०२५ ते २ ऑगस्ट २०२५ या कालावधीत वेळोवेळी रोख स्वरूपात आणि ऑनलाईन माध्यमातून ४ लाख ११ हजार ५०० रुपये आरोपींना दिले.
पैसे देऊनही नोकरी मिळत नसल्याने आणि आरोपी टाळाटाळ करत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे क्षीरसागर यांच्या लक्षात आले. त्यांनी केवळ तक्रार न देता, आरोपींसोबत झालेले व्हॉट्सॲप चॅटिंग, फोन पे द्वारे दिलेले पैसे आणि ऑडिओ रेकॉर्डिंगचे पुरावे गोळा केले. विशेष म्हणजे, त्यांनी हे सर्व डिजिटल पुरावे सायबर फॉरेन्सिक लॅबकडून प्रमाणित (व्हेरिफाय) करून घेतले असून, त्याबाबतचा पेनड्राइव्ह आणि कागदपत्रे पोलिसांकडे सुपूर्द केली आहेत.
बारामती शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून नोकरीच्या नावाखाली अशा प्रकारे अन्य कोणाची फसवणूक झाली आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. पोलीस हवालदार खाडे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.


