बिबवेवाडीत क्लोरीन गॅसची गळती
मोकळ्या जागेत पुणे महानगरपालिकेचा क्लोरीन सिलेंडर निष्काळजीपणे ठेवल्याने ही दुर्घटना घडली
1 min read

मोकळ्या जागेत पुणे महानगरपालिकेचा क्लोरीन सिलेंडर निष्काळजीपणे ठेवल्याने ही दुर्घटना घडली
पुणे: बिबवेवाडी परिसरातील गंगाधाम रोडवर क्लोरीन गॅसची गळती झाल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली. मोकळ्या जागेत पुणे महानगरपालिकेचा क्लोरीन सिलेंडर निष्काळजीपणे ठेवल्याने ही दुर्घटना घडली असून, विषारी वायूमुळे स्थानिक रहिवासी आणि कामगारांना श्वास घेण्यास त्रास झाला. लोकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी कोंढवा येथे राहणाऱ्या एका ३३ वर्षीय व्यक्तीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८६, १२५, १२५ (ए), ३(५) आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ७, ८, १५ नुसार गुन्हा नोंदवला आहे.
भरवस्तीत निष्काळजीपणाचा कळस
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. ३०) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास गंगाधाम रोडवरील वर्धमान लॉन्सच्या समोर ही घटना घडली. येथील एका मोकळ्या जागेत पुणे महानगरपालिकेद्वारे पुरवण्यात येणारा क्लोरीनचा सिलेंडर अत्यंत बेजबाबदारपणे ठेवण्यात आला होता. या सिलेंडरची कोणतीही योग्य देखभाल किंवा सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात आली नव्हती.
श्वास कोंडला, नागरिकांची धावपळ
या सिलेंडरमधून अचानक विषारी वायूची गळती सुरू झाली. वायूचा प्रसार होताच आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना आणि जवळच असलेल्या गोदामांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना श्वास घेण्यास प्रचंड त्रास जाणवू लागला. डोळे जळजळणे आणि गुदमरल्यासारखे वाटू लागल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीविताला मोठा धोका निर्माण झाला होता.
घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते या प्रकरणाचा अधिक तपास करत असून हा सिलेंडर तिथे कुणी आणि का ठेवला, याचा शोध घेतला जात आहे.


