Pune News : मुलांमधील वाढता लठ्ठपणा चिंतेचा विषय
Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर : लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये वाढत असलेला लठ्ठपणा हा चिंतेचा विषय बनला आहे.
2 min read

स्मिता कुलकर्णी.
Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर : लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये वाढत असलेला लठ्ठपणा हा चिंतेचा विषय बनला आहे. मुलांचे वाढते वजन ही केवळ दिसण्याशी संबंधित बाब नसून त्याचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. उच्च कॅलरीयुक्त आहार, जंक फूडचे वाढते सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव, वाढता स्क्रीन टाइम, अनुवंशिक प्रवृत्ती आणि बदलती जीवनशैली यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
बालपणातील लठ्ठपणामुळे पुढील काळात मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार तसेच सांध्यांशी संबंधित समस्या निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो. काही मुलांमध्ये वारंवार थकवा, डोकेदुखी, व्यायामाची क्षमता कमी होणे, घोरणे किंवा स्लीप ॲप्निया आणि विशेषतः गुडघे व कंबरेच्या सांध्यांमध्ये दुखणे अशी लक्षणे दिसू शकतात. शरीराच्या दुमडलेल्या भागांवर काळसर, मखमलीसारखे डाग दिसणे हे इन्सुलिन रेझिस्टन्सचे संकेत असू शकतात.https://maharashtramirror.com/ Pune News
लठ्ठपणाचा परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावरही होऊ शकतो. कमी आत्मविश्वास, नैराश्य, सामाजिक संकोच तसेच वजनावरून होणारी चेष्टा किंवा टोमणे यामुळे मुलांवर मानसिक ताण येऊ शकतो. त्यामुळे मुलांच्या वजनाकडे केवळ बाह्य स्वरूपाच्या दृष्टीने न पाहता त्यांच्या एकूण आरोग्याच्या दृष्टीने लक्ष देणे आवश्यक आहे.
मुलांचे वजन कमी करण्यासाठी कठोर किंवा क्रॅश डाएट करण्याऐवजी संतुलित आहार, नियमित शारीरिक हालचाल आणि पुरेशी झोप यावर भर देणे गरजेचे आहे. फळे, भाज्या, कडधान्ये, संपूर्ण धान्ये आणि पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करावा. साखरयुक्त पेये, पॅकेज्ड पदार्थ आणि जंक फूडचे प्रमाण मर्यादित ठेवावे. मुलांना दररोज मैदानी खेळ आणि व्यायामासाठी प्रोत्साहित करण्याबरोबरच स्क्रीन टाइमवरही नियंत्रण ठेवावे.
पालकांची भूमिका महत्त्वाची
पालकांनी मुलांच्या वजनाबाबत त्यांच्यावर दबाव आणण्याऐवजी संपूर्ण कुटुंबानेच निरोगी जीवनशैली स्वीकारणे महत्त्वाचे आहे. मुलाचे वजन वेगाने वाढत असल्यास किंवा वरीलपैकी लक्षणे दिसत असल्यास स्वतःहून डाएट सुरू न करता बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आवश्यकतेनुसार डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली वजन, उंची, वाढीचा वेग आणि इतर आरोग्यविषयक बाबींची तपासणी करणे उपयुक्त ठरते.
“मुलांचे आरोग्य घडवायचे असेल, तर सुरुवात त्यांच्या ताटापासून नव्हे, आपल्या वागण्यातून करा. पालक जसे जगतात, तसेच मुलं शिकतात. त्यामुळे वजन कमी करण्याच्या ध्यासापेक्षा संपूर्ण कुटुंबाची जीवनशैली निरोगी करण्यावर भर द्या. ‘हे खाऊ नको’ म्हणण्यापेक्षा पौष्टिक पदार्थ आनंदाने खाण्याची सवय लावा आणि चविष्ट, पौष्टिक पर्यायांचा शोध घ्या. मुलांच्या वाढत्या वयात अनावश्यक बंधने न घालता, साखर, मैदा यांसारख्या पोषणमूल्य कमी असलेल्या पदार्थांचे प्रमाण मर्यादित ठेवा. आरोग्याशी संबंधित औषधेही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच द्या. आणि सर्वात महत्त्वाचे—चॉकलेट, पेस्ट्री किंवा जंक फूडला बक्षीस बनवू नका; कारण मुलांना आपण जे बक्षीस देतो, त्याचीच इच्छा त्यांच्या मनात अधिक घट्ट बसते. आरोग्य ही सवय आहे, शिक्षा किंवा बंधन नाही—आणि त्या सवयीची पहिली शाळा म्हणजे घर.”
— डॉ. अर्चना रायरीकर, आहारतज्ज्ञ.


