Skip to content

Pune Crime : दोन हजार रुपयांसाठी मजुराचा खून; आरोपी दिल्लीतून जेरबंद

Pune Crime : पिंपरी, महाराष्ट्र मिरर : अवघ्या दोन हजार रुपयांच्या वादातून मजुराचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे हात-पाय बांधून, पायाला दगड बांधत मृतदेह तलावात फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 min read

दोन हजार रुपयांसाठी मजुराचा खून; आरोपी दिल्लीतून जेरबंद
दोन हजार रुपयांसाठी मजुराचा खून; आरोपी दिल्लीतून जेरबंद

Pune Crime : बावधनमधील खुनाचा गुन्हे शाखा युनिट-२ आणि गुंडाविरोधी पथकाकडून उलगडा

Pune Crime : पिंपरी, महाराष्ट्र मिरर : अवघ्या दोन हजार रुपयांच्या वादातून मजुराचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे हात-पाय बांधून, पायाला दगड बांधत मृतदेह तलावात फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बावधन पोलिस ठाण्यात दाखल या प्रकरणातील मुख्य आरोपी गोपाल ऊर्फ राज साधोन बिस्वास (वय २०) याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-२ आणि गुंडाविरोधी पथकाने गाझीपूर, दिल्ली येथून ताब्यात घेतले. https://maharashtramirror.com/wp-admin/post-new.php Pune Crime

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास मुळशी तालुक्यातील दुधाळेवस्ती येथील एक व्यक्ती घरातून बाहेर गेली होती. मात्र, ती परत न आल्याने अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून किंवा फूस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून बावधन पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू असतानाच २ सप्टेंबर रोजी दुधाळेवस्ती परिसरातील तलावात तिचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे हात-पाय बांधलेले होते, तसेच पायाला दगड बांधण्यात आला होता. त्यानंतर प्रकरणात भारतीय न्याय संहितेचे कलम १०३(१) आणि २३८ वाढविण्यात आले.https://maharashtramirror.com/ Pune Crime

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या निर्देशानुसार गुन्हे शाखेची स्वतंत्र पथके तपासासाठी नियुक्त करण्यात आली. घटनास्थळ ग्रामीण भागात असल्याने सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नव्हते. मृत व्यक्ती रविवारी पिरंगुटच्या बाजारात गेल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही तसेच दारूच्या दुकानांतील फुटेज तपासण्यात आले; मात्र सुरुवातीला ठोस धागा हाती लागला नाही. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणातून खुनाचा संबंध गाझीपूर, दिल्ली येथील दोन मजुरांशी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. खुनानंतर ते दिल्लीला निघून गेल्याचेही तपासात समोर आले.

यानंतर पोलिस उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे यांच्या पथकाला तातडीने दिल्लीला रवाना करण्यात आले. संशयित कचरा वेचणे आणि मिळेल ते मजुरीचे काम करत असल्याने त्याचे निश्चित वास्तव्य नव्हते. तो मोबाईलही वापरत नसल्याने शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. पथकाने तीन दिवस पारंपरिक पद्धतीने तपास करून सापळा रचला आणि मुख्य आरोपी गोपाल ऊर्फ राज साधोन बिस्वास याला गाझीपूरमधील मुर्गा मंडीसमोरील पुलाखालून ताब्यात घेतले. तो मूळचा पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बीबीपुली गावचा असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड व बसवराज तेली, पोलिस उपायुक्त रोहिदास पवार आणि सहायक पोलिस आयुक्त सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-२ व गुंडाविरोधी पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास बावधन पोलिसांकडून सुरू आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share