Skip to content

प्रशांत वाघमारे अँड कंपनीच्या नावाने शहरात बॅनरबाजी

“निवृत्तीनंतरही आकाच्या चेल्यांचा डंका” अशा मजकुरातून भ्रष्टाचार आणि लुटारू टोळीचे आरोप

PG
Prashik Ghaste

1 min read

प्रशांत वाघमारे अँड कंपनीच्या नावाने शहरात बॅनरबाजी

“निवृत्तीनंतरही आकाच्या चेल्यांचा डंका” अशा मजकुरातून भ्रष्टाचार आणि लुटारू टोळीचे आरोप

वाघमारे यांनी पदाचा गैरवापर करून उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा तब्बल २,००० कोटींपेक्षा अधिक मालमत्ता जमा केल्याचा आरोप आहे

निलेश राऊत
पुणे: पुणे शहरात महापालिकेच्या बांधकाम विभागावर गंभीर आरोप करणारे बॅनर झळकल्याने खळबळ उडाली आहे. “निवृत्तीनंतरही आकाच्या चेल्यांचा डंका” अशा मजकुरातून भ्रष्टाचार आणि लुटारू टोळीचे आरोप करण्यात आले आहेत. प्रशांत वाघमारे यांच्या नावाने लागलेल्या या बॅनरची शहरभर जोरदार चर्चा सुरू असून प्रशासनातही कुजबुज वाढली आहे.

पुणे महापालिकेचे माजी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. सुमारे २,००० कोटी रुपयांच्या बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या चौकशीत हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला व त्यांची याचिका फेटाळून लावली होती. या निर्णयामुळे आरोपांच्या सखोल चौकशीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र अद्याप याप्रकरणी पुढील कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यातच वाघमारे यांच्या नावाचे बॅनर शहरात झळकत असल्याने हे बॅनर लावले कोणी याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत.

काय आहे हे प्रकरण
वाघमारे यांनी पदाचा गैरवापर करून उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा तब्बल २,००० कोटींपेक्षा अधिक मालमत्ता जमा केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण २०१६ मध्ये पहिल्यांदा समोर आले. सामाजिक कार्यकर्ते ऍड. तानाजी गंभीरे यांनी वाघमारे यांनी पुणे महापालिकेच्या भवन रचना विभागात महत्त्वाच्या पदावर असताना भ्रष्टाचार केल्याचा आणि हा पैसा पत्नी व भावाच्या नावावरील कंपन्यांमध्ये वळविल्याचा आरोप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केला होता.

२०१९ मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्तांनी वाघमारे यांच्याविरुद्धची चौकशीचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. मात्र, उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्दबातल ठरवताना कडक ताशेरे ओढले होते. आयुक्तांनी चौकशीला परवानगी नाकारून एक प्रकारे 'मिनी ट्रायल' चालवली आणि सार्वजनिक सेवकाला वाचविण्याचा प्रयत्न केला, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते. हाच निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.

Banners in the city in the name of Prashant Waghmare & Company

Share