Skip to content

मावळमध्ये तरुणाचा खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न; दोघांवर गुन्हा दाखल

मृतदेह तिथेच टाकून त्यावर मोटारसायकल ठेवून दुचाकी पेटवून दिली

PG
Prashik Ghaste

1 min read

मावळमध्ये तरुणाचा खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न; दोघांवर गुन्हा दाखल

मृतदेह तिथेच टाकून त्यावर मोटारसायकल ठेवून दुचाकी पेटवून दिली

पुणे: मावळ तालुक्यातील प्रभाचीवाडी येथे एका ३३ वर्षीय तरुणाचा अज्ञात कारणावरून निर्घृण खून करून, पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह दुचाकीसह पेटवून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दोन संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

अमोल अनंता मोहोळ (वय ३३, रा. वारू, पवनानगर, ता. मावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ स्वप्निल अनंता मोहोळ (वय ३०) याने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भरत उर्फ भोया वाल्हेकर (वय २७) आणि सुनील पवार (वय ३४, दोघे रा. पवनानगर, ता. मावळ) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) (खून), २३८ (पुरावा नष्ट करणे) आणि ३(५) नुसार गुन्हा नोंदवला आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवार (ता. २५) रात्री ९ ते मंगळवार (ता. २८) सकाळी ११ च्या दरम्यान घडली. आरोपी भरत वाल्हेकर आणि सुनील पवार यांनी अमोल याला त्याच्याच मोटारसायकलसह सोबत नेले होते. मौजे प्रभाचीवाडी येथील 'अमरजा हिल्स सोसायटी’च्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अज्ञात कारणावरून आरोपींनी अमोलवर हत्याराने वार करून त्याचा खून केला.

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
खून केल्यानंतर आरोपींनी हा प्रकार लपवण्यासाठी क्रौर्याची सीमा ओलांडली. त्यांनी अमोलचा मृतदेह तिथेच टाकून त्यावर त्यांची ‘हिरो होंडा सीडी डिलक्स’ मोटारसायकल ठेवली आणि मृतदेहासह दुचाकी पेटवून दिली. मंगळवारी सकाळी हा जळालेला मृतदेह आणि दुचाकी आढळून आल्यानंतर या भीषण हत्याकांडाचा खुलासा झाला.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. या निर्घृण हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस उपनिरीक्षक अरगडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Share