Skip to content

भोरमधील कंपनीवर टोळक्याचा सशस्त्र हल्ला

जुन्या वादातून कोयत्याने वार करत 'सीसीटीव्ही’ची तोडफोड

PG
Prashik Ghaste

1 min read

भोरमधील कंपनीवर टोळक्याचा सशस्त्र हल्ला

जुन्या वादातून कोयत्याने वार करत 'सीसीटीव्ही’ची तोडफोड

पुणे: भोर तालुक्यातील कासुर्डी खेबा येथील एका इलेक्ट्रॉनिक कंपनीच्या प्रवेशद्वारावर जुन्या भांडणाच्या कारणावरून १० ते १२ जणांच्या टोळक्याने राडा घातल्याची घटना घडली आहे. या टोळक्याने कंपनीच्या कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार करून त्याला जखमी केले, तसेच सुरक्षा केबिन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण केली. गुरुवारी (ता. २३) पहाटे एकच्या सुमारास हा प्रकार घडला.

Photos · 1/1

Arrow Keys ⟵ ⟶

याप्रकरणी आदित्य अभिमन्यू शेजवळ (वय २२, रा. सांगवी बुद्रुक, ता. भोर) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रोहित उर्फ दादू लिमण (रा. विहार, ता. राजगड) आणि त्याच्यासोबत असलेल्या ८ ते १० अनोळखी साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ३३३, १८९, १९१(२), १९१(३), ३२४(४) आणि आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी, की फिर्यादी आदित्य हे कासुर्डी खेबा येथील ‘सीएम इलेक्ट्रॉनिक’ कंपनीत कामाला आहेत. गुरुवारी पहाटे आरोपी रोहित उर्फ दादू लिमण हा त्याच्या साथीदारांसह कंपनीच्या गेटवर आला. जुन्या भांडणाची कुरापत काढून त्याने आदित्यला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी रोहितने हातातील कोयत्याने आदित्यच्या डाव्या हाताच्या करंगळीवर जोरात वार करून त्याला जखमी केले.

इतक्यावरच न थांबता, या टोळक्याने आदित्यचा मित्र अथर्व याला शोधत शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी कंपनीच्या गेटवर असलेल्या सुरक्षा केबिनच्या काचा फोडल्या आणि सीसीटीव्ही कॅमेरे तोडून नुकसान केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे कंपनी परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. तोडफोड केल्यानंतर आरोपी तेथून पसार झाले.

राजगड पोलिसांनी या घटनेचा गांभीर्याने तपास सुरू केला असून, मुख्य आरोपी रोहित लिमण आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे. पोलीस नाईक मेस्त्री या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. औद्योगिक परिसरात कामगारांवर होणाऱ्या अशा हल्ल्यांमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Armed gang attacks company in Bhor

Share