Pune News : भाजपाने ‘सगळ्या जागा आम्हीच लढवणार’ ही मानसिकता सोडावी; आनंद परांजपेंचा खोचक टोला
Pune News :पुणे , महाराष्ट्र मिरर : विधान परिषद निवडणुकीतील पराभवावरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
2 min read

Pune News :पुणे , महाराष्ट्र मिरर : विधान परिषद निवडणुकीतील पराभवावरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिंदेसेनेमुळे पुणे आणि मराठवाड्यात पराभव झाल्याचा आरोप केला होता. या आरोपांना शिंदेसेनेचे प्रवक्ते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी प्रत्युत्तर दिले. ‘प्रत्येक निवडणुकीत सगळ्या जागा आम्हीच लढवणार आणि आम्हीच जिंकलं पाहिजे,’ ही भावना भाजपाने सोडली पाहिजे, असा खोचक टोला परांजपे यांनी लगावला. तसेच, पुण्यातील एक जागा शिवसेनेला मिळावी, अशी मागणी करूनही ती दिली गेली नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.https://maharashtramirror.com/ Pune News
समन्वय असता, तर पाचही जागा जिंकल्या असत्या!
आनंद परांजपे म्हणाले, की विधान परिषद निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये अधिक चांगला समन्वय असता, तर पाचही जागांवर विजय मिळवता आला असता. या निवडणुकीत भाजपची प्रमुख भूमिका होती. पहिल्या दिवसापासूनच पुणे पदवीधर किंवा पुणे शिक्षक मतदारसंघापैकी एक जागा शिवसेनेला मिळावी, अशी पक्षाची भूमिका होती.
महायुतीच्या समन्वय बैठकीत चार जागांबाबत निर्णय झाला. मात्र, त्यानंतर भाजपने तीन उमेदवार जाहीर केले. शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांनी अर्ज दाखल केला होता; मात्र, अखेर त्यांनी आपला अर्ज मागे घेतला. पुण्यातील दोनपैकी एक जागा शिवसेनेला मिळावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र, ही मागणी मान्य झाली नाही, अशी खंत परांजपे यांनी व्यक्त केली.
भाजपने आत्मचिंतन करावे
अमरावतीमध्ये भाजपचे तीन बंडखोर उमेदवार रिंगणात असतानाही शिवसेनेने भाजपवर कोणतीही टीका केली नाही, असे परांजपे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शिंदेसेनेवर पराभवाचे खापर फोडण्याऐवजी भाजपने स्वतःच्या कामगिरीचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
‘शिवसेनेवर आरोप करण्यापेक्षा जगातील सर्वांत मोठ्या पक्षाने आत्मचिंतन केले, तर ते अधिक चांगले ठरेल,’ असे परांजपे म्हणाले. प्रत्येक निवडणुकीत सर्व जागा स्वतःच लढवायच्या आणि सर्व जागा जिंकण्याची अपेक्षा ठेवायची, या मानसिकतेला महायुतीतील घटकपक्ष म्हणून भाजपने मुरड घालण्याची गरज आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
पुण्यातील दोन्ही जागा या मूळच्या भाजपच्या नव्हत्या. त्यापैकी एक जागा शिवसेनेला मिळावी, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. मात्र, जागावाटपात शिवसेनेला संधी न मिळाल्याने नाराजी निर्माण झाली. त्यामुळे पराभवासाठी शिवसेनेला जबाबदार धरण्यापेक्षा महायुतीतील समन्वय आणि जागावाटपाच्या निर्णयांचा फेरविचार करणे आवश्यक असल्याचे परांजपे यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले.


