संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती टळली!
पुण्यात भरदिवसा पीएमपी बस पळवली; शिवाजीनगर पोलिसांकडून तरुणाला अटक
2 min read

पुण्यात भरदिवसा पीएमपी बस पळवली; शिवाजीनगर पोलिसांकडून तरुणाला अटक
ड्रायव्हर बसमध्येच चावी विसरल्याचा घेतला फायदा; आरोपीच्या मानसिक संतुलनाबाबत पोलिसांना शंका
पुणे: थेट संतोष माने प्रकरणाची आठवण व्हावी अशी घटना पुण्यात घडली आहे. पुणे महापालिका भवन परिसरातून चक्क पीएमपी बस पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एका २० वर्षीय तरुणाला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध चोरी आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या समयसूचकतेमुळे वर्दळीच्या रस्त्यावर होणारा मोठा अपघात टळला असून आरोपीला सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गोपालसिंह दिलवरसिंह राणा (वय २०, रा. घटासरी, गढवाल, उत्तराखंड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीएमपीचे पर्यवेक्षक ऋषीकेश मुटके यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
काय केले संतोष मानेने
२५ जानेवारी २०१२ रोजी पुण्यात संतोष माने या एसटी बस चालकाने स्वागरेट बस स्थानकातून बस चोरून शहरात बेदरकारपणे चालवल्यामुळे नऊ लोकांना प्राण गमवावे लागले होतो तर अनेकजण जखमी झाले होते. न्यायालयाला त्याने मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे कारण दिले पण न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती.
ताजा थरार असा घडला
मिळालेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल रोजी ही घटना घडली. महापालिका भवन येथे उभी असलेल्या एका बसचा चालक आपली चावी सुकाणूजवळच विसरला होता. याचा फायदा घेत आरोपी गोपालसिंह याने थेट बस सुरू केली आणि ती पळवली. त्याने ही बस जंगली महाराज रस्त्याने नामदार गोपाळ कृष्ण गोखले (फर्ग्युसन रस्ता) रस्त्यापर्यंत वेगाने नेली.
पोलिसांनी रोखली बस
बस पळवून नेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी केली. गोखले स्मारक चौकात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने तैनात असलेल्या पोलिसांनी मोठ्या धैर्याने ही बस अडवली आणि आरोपीला ताब्यात घेतले. भरवस्तीत आणि वाहनांची मोठी वर्दळ असताना बस पळवल्यामुळे अनेक नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला.
मानसिक संतुलन बिघडल्याची शंका
पोलिसांनी आरोपीच्या आईशी संपर्क साधला असता, तो पुण्यात कधी आणि कसा पोहोचला, याची तिला काहीच कल्पना नव्हती. ताब्यात घेतल्यानंतरही आरोपी सातत्याने विसंगत बोलत होता. त्याचे हे वर्तन पाहून वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषकुमार दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचे मानसिक संतुलन बिघडल्याचा पोलिसांना संशय आहे.
चालकांचा निष्काळजीपणा ऐरणीवर
बसमध्येच चावी विसरून गेल्यामुळे ही चोरीची घटना घडली. यामुळे पीएमपी प्रशासनाच्या सुरक्षिततेवर आणि चालकांच्या निष्काळजीपणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सार्वजनिक मालमत्तेची आणि प्रवाशांची सुरक्षा राखण्यासाठी कर्मचाऱ्यांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
A repeat of the Santosh Mane case was avoided!


