पुण्यात ८७ वर्षीय वृद्धाला 'मुंबई क्राईम ब्रँच’ची भीती दाखवून ४६ लाखांचा गंडा
‘सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांकडे केस’ असल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिकाला ऑनलाईन लुटले
1 min read

‘सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांकडे केस’ असल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिकाला ऑनलाईन लुटले
पुणे/डेक्कन: पुणे शहरातील डेक्कन जिमखाना परिसरात राहणाऱ्या एका ८७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला ऑनलाईन फसवणुकीच्या जाळ्यात ओढून सायबर भामट्यांनी तब्बल ४६ लाख रुपयांची प्रचंड आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकाराबाबत डेक्कन जिमखाना परिसरात राहणाऱ्या एका ८७ वर्षीय पीडित ज्येष्ठ नागरिकाने डेक्कन पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे [१३८/२०२६]. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी डेक्कन पोलिसांनी अज्ञात मोबाईलधारक, बँक खातेधारक आणि वापरकर्त्याविरुद्ध गंभीर गुन्ह्याची नोंद केली आहे.

हा फसवणुकीचा प्रकार रविवार, दि. २४ मे २०२६ ते मंगळवार, दि. २६ मे २०२६ या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८७ वर्षीय फिर्यादी हे डेक्कन परिसरात सेवानिवृत्त जीवन जगत आहेत. गेल्या रविवारी त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला. समोरील व्यक्तीने ‘मुंबई क्राईम ब्रँच’ (गुन्हे शाखा) मधून बोलत असल्याची बतावणी करत "तुमच्याविरुद्ध गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला असून हे प्रकरण थेट ‘भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे’ चौकशीसाठी गेले आहे, अशी अत्यंत भीतीदायक खोटी माहिती फिर्यादी वृद्धाला दिली. त्यानंतर पोलिसांकडून तात्काळ अटक करण्याची धमकी देत फिर्यादी यांच्या सर्व बँक खात्यांची गोपनीय माहिती हस्तगत करण्यात आली आणि वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे पाठवण्यास सांगितले. घाबरलेल्या वृद्धाने आपल्या आयुष्याची संपूर्ण जमापुंजी असलेले एकूण ४६ लाख रुपये चोरांनी सांगितलेल्या बँक खात्यांवर टप्प्याटप्प्याने ऑनलाईन पद्धतीने वर्ग केले. संपूर्ण रक्कम खात्यावर जमा झाल्यानंतर चोरांनी आपले संपर्क क्रमांक बंद केले, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी तत्काळ डेक्कन पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
डेक्कन पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती सपना देवतेळे या गंभीर स्वरूपाच्या सायबर फसवणुकीच्या गुन्ह्याचा पुढील सखोल आणि तांत्रिक तपास करत आहेत.


