Skip to content

विधान परिषदेसाठी पुण्यात ७ उमेदवारांचे अर्ज

दोन्ही राष्ट्रवादीसह, भाजप, अपक्षांचे अर्ज

PG
Prashik Ghaste

1 min read

विधान परिषदेसाठी पुण्यात ७ उमेदवारांचे अर्ज

दोन्ही राष्ट्रवादीसह, भाजप, अपक्षांचे अर्ज

निलेश राऊत
पुणे:
विधान परिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सात उमेदवारांनी ११ अर्ज दाखल केले आहेत. त्यात प्रामुख्याने राष्ट्रवादी कांग्रेसच्या दोन्ही गटांच्या प्रत्येकी दोन उमेदवारांचा समावेश आहे. भाजपच्या प्रदीप कंद यांनी पक्षाकडून आणि अपक्ष असे दोन अर्ज भरले आहेत. तर दोन अपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत.

अर्जाची छाननी मंगळवारी (दि. २) रोजी होणार असून अर्ज माघारीसाठी दोन दिवसांचा अवधी देण्यात आला आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी दिली. या निवडणुकीसाठी मतदान होणार की निवडणूक बिनविरोध होणार हे बुधवारी (दि. ४) स्पष्ट होणार आहे.

सुनील टिंगरे यांनीही अर्ज भरला
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सात जणांनी ११ अर्ज भरले असल्याची माहिती पाटील यांनी दिली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या विक्रम काकडे यांनी अधिकृत अर्ज भरला आहे. तर याच पक्षाचे सुनील टिंगरे यांनीही अर्ज भरला आहे. टिंगरे यांचा अर्ज डमी असल्याचे बोलले जात आहे.

श्रीकांत पाटील रिंगणात
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे श्रीकांत पाटील तसेच तुषार कामठे यांनी अर्ज भरला आहे. यातील कामठे यांचा अर्ज डमी असल्याची माहिती आहे. तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी भाजपतर्फे तसेच अपक्ष असे दोन अर्ज भरले आहेत. याशिवाय उमेश म्हेत्रे आणि रणजीत तरे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, अर्जाची छाननी मंगळवारी (दि. २) होणार असून अर्ज माघारी बुधवारपर्यंत (दि. ४) घेता येणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

Share