२८ लाखांची बॅग घेऊन कामगार पसार; चौघांना अटक
खडक पोलिसांची उत्तर प्रदेशात २५ दिवस मोहीम; २६.३३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
2 min read

पुणे, महाराष्ट्र मिरर : कार्यालयातील सोन्या-चांदीचे दागिने आणि २८ लाख रुपये रोख असलेली बॅग मुंबईत पोहोचवण्याची जबाबदारी दिलेल्या कामगारानेच बॅग घेऊन पलायन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा तपास करताना खडक पोलिसांनी तब्बल २५ दिवसांत १० हजार किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास करून उत्तर प्रदेशातून चार आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून २६ लाख ३३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पैशाचं अपहार केल्याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (४) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी विशाल सत्यपाल चौहान (वय २०, मूळ रा. मिसा कलान, थाना अवागढ, जिल्हा एटा, उत्तर प्रदेश) याच्याकडे सोन्या-चांदीचे दागिने आणि २८ लाख रुपये रोख असलेली बॅग मुंबईतील कार्यालयात जमा करण्यासाठी दिली होती. मात्र, बॅग मुंबईत न पोहोचवता विशाल मध्येच उतरून पसार झाला.
पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असता तो उत्तर प्रदेशातील गावी नातेवाईकांकडे लपल्याची माहिती मिळाली. तपासात विशालने त्याचा भाऊ बिनेश सत्यपालसिंग चौहान, मित्र विकासकुमार जाधोन, ब्रिजेश चौहान आणि अन्य एका साथीदाराच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न ज-हाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने उत्तर प्रदेशातील एटा, कासगंज आणि गौतमबुद्धनगर जिल्ह्यांसह नोएडा व डेहराडून परिसरात तपास केला.
२५ दिवसांच्या या मोहिमेत पथकाने १० हजार किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास केला. स्थानिक पोलिसांच्या मदतीने चार आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. अटक केलेल्या आरोपींमध्ये विशाल सत्यपाल चौहान (वय २०), विकासकुमार रामबीरसिंग जाधोन (वय २९), बिनेश सत्यपालसिंग चौहान (वय २७) आणि ब्रिजेश सुरेंद्रसिंग चौहान (वय १९) यांचा समावेश आहे.
असा केला मुद्देमाल जप्त
पोलिसांनी विकासकुमार जाधोन याच्या राहत्या घरातून १२० ग्रॅम वजनाची सोन्याची दोन बिस्किटे जप्त केली. त्यांची किंमत १६ लाख ८० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. तसेच ब्रिजेश चौहान याच्या घरातून सात लाख रुपये रोख, एक सोन्याची अंगठी आणि एक चांदीची चेन जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण २६ लाख ३३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न ज-हाड करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृष्णकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शर्मिला सुतार आणि समाधान पवार यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. तपास पथकात सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न ज-हाड, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, राहुल मखरे आणि पोलीस अंमलदार विनोद शिंदे, मयूर भोसले, हेमंत पेरणे, अमित जमदाडे, निलेश साबळे, विकास पांडुळे, सैफ नदाफ, उमेश मठपती, संतोष साबळे आणि सागर कुडले यांचा समावेश होता.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper


