२०० फुटांपेक्षा खोल बोअरवेल खोदल्यास बंदी! सुनेत्रा पवारांचे दुष्काळी आढावा बैठकीत कडक निर्देश
नांदेडमध्ये पाणी, चारा आणि रब्बी पेरणीचा घेतला आढावा; चारा नियोजनासाठी ३ कोटींचा निधी मंजूर, सक्तीची कर्जवसुली न करण्याचे आदेश
2 min read

नांदेड : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या सुरुवातीलाच सकाळी ९ वाजता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्ह्यातील पाणी आणि चाऱ्याची उपलब्धता, रब्बी हंगामातील पेरणी, भूजल पातळी तसेच आगामी काळातील टंचाई निवारणाच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत २०० फुटांपेक्षा अधिक खोल बोअरवेल खोदण्यावर बंदी घालण्याचे कडक निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले.
२०० फुटांपेक्षा खोल बोअरवेल खोदण्यास मनाई
जिल्ह्यातील भूजल पातळी झपाट्याने खालावत असल्याने पाण्याचा उपसा आणि बोअरवेल खोदण्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले. त्यानुसार २०० फुटांपेक्षा जास्त खोल बोअरवेल खोदण्यास बंदी घालण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच भूजल पातळी वाढवण्यासाठी जलतारा प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. रखडलेले जलसिंचन प्रकल्प लवकर पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
चारा नियोजनासाठी ३ कोटींचा निधी
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. चारा नियोजनासाठी तीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, आतापर्यंत १४ हजार शेतकऱ्यांना चारा वाटप करण्यात आल्याची माहिती सुनेत्रा पवार यांनी दिली. शेतकऱ्यांनी आगामी काळात चारा पिकांची लागवड करावी, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. टंचाई निवारणाच्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
धर्माबादमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा
दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद शहरातही संभाव्य पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. पावसाने पाठ फिरवल्याने नगरपालिका प्रशासनाने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. बाभळी बंधारा आणि इळेगाव नदीपात्रातील पाणीसाठा जानेवारीपर्यंतच पुरेल, अशी परिस्थिती असल्याने दररोजचा पाणीपुरवठा तीन दशलक्ष लिटरवरून दीड दशलक्ष लिटरपर्यंत कमी करण्यात आला आहे. शहरातील सुमारे ४२ हजार ५०० नागरिकांसाठी ३ हजार नळजोडण्या, ९५ बोअरवेल आणि ३३ हातपंपांचे पर्याय उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि पाण्याची नासाडी टाळावी, असे आवाहन मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे यांनी केले आहे.
पत्रकारांना बैठकीत प्रवेश नाकारला
दरम्यान, अलीकडेच कृषिमंत्र्यांच्या बैठकीत आमदार आणि खासदारांनी काजू-बदाम खाल्ल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या या दुष्काळी आढावा बैठकीत पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे या बैठकीतील चर्चेची माहिती आणि निर्णयांबाबत माध्यमांना मर्यादित माहिती मिळाली.

Maharashtra Mirror




