हाँगकाँग लेनमधील ५७ स्टॉल मनपाने केले सील
शहरभरात ५० हजार ७०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त; जेएम रस्ता, खाऊ गल्लीसह पाचही परिमंडळांत अतिक्रमणांवर बुलडोझर
3 min read

पुणे: फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील कारवाईनंतर पुणे महापालिकेच्या अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने बुधवारी दि. १८ रोजी जंगली महाराज रस्ता आणि हाँगकाँग लेन परिसरात धडक कारवाई केली. या मोहिमेत नियम व अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी हाँगकाँग लेनमधील ५७ स्टॉल सील करण्यात आले असून, जेएम रोड कॉर्नर आणि खाऊ गल्ली परिसरातील सुमारे १३ हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले आहे.
महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर आणि परिमंडळ दोनचे उपायुक्त अविनाश सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. शिवाजीनगर-घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या जंगली महाराज मंदिर खाऊ गल्ली, जेएम रोड कॉर्नर आणि हाँगकाँग लेन येथे महापालिकेने मोठ्या बंदोबस्तात कारवाई केली.
महापालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या हाँगकाँग लेनमधील ५७ स्टॉलधारकांनी निर्धारित अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्याने हे सर्व स्टॉल सील करण्यात आले. याशिवाय, या भागातून १५ पथारी काउंटर, २९ गॅस सिलिंडर, एक अतिरिक्त स्टॉल आणि एक हातगाडी जप्त करण्यात आली. या कारवाईवेळी सहायक उपायुक्त कैलास वाळेकर, सहायक आयुक्त बाळासाहेब ढवळे आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे (एमएसएफ) मुख्य अधिकारी शहाजी पवार उपस्थित होते.
शहरभरात ५०,७०० चौरस फुटांचे अतिक्रमण हटवले
बुधवारी महापालिकेच्या सर्व पाचही परिमंडळांमध्ये एकाच वेळी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. संपूर्ण शहरात एकूण ५० हजार ७०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईत ५५ पथारी स्टॉल, ३० गॅस सिलिंडर, चार हातगाड्या, एक स्टॉल आणि इतर ५९ साहित्य जप्त करण्यात आले. या व्यापक मोहिमेसाठी १० जेसीबी यंत्रे, १० गॅस कटर, ५ ब्रेकर, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे ८० जवान, १३ पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि महापालिकेचे २५० बिगारी मजूर तैनात करण्यात आले होते.
या मोहिमेतील सर्वात मोठी कारवाई हडपसर गावठाण, सोलापूर रस्ता, भाजी मंडई परिसर आणि तुकाई टेकडी येथे करण्यात आली. येथे तब्बल २३ हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. तसेच दोन हातगाड्या, सहा काउंटर, एक गॅस सिलिंडर आणि इतर सहा वस्तू जप्त केल्या गेल्या.
विमाननगर, निको गार्डन, साकोरे नगर, दत्त मंदिर चौक, सांबार हॉटेल लेन आणि सीसीडी चौक परिसरातील सुमारे ९ हजार ७०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले. या ठिकाणाहून सात पथारी स्टॉल आणि ५० इतर साहित्य जप्त करण्यात आले.सिंहगड रस्ता, पर्वती जलकेंद्र, हिंगणे खुर्द, राजाराम पूल, आनंदनगर, खडकवासला आणि किरकटवाडी परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करत सुमारे ३ हजार चौरस फुटांचे बांधकाम पाडण्यात आले आणि सात पथारी स्टॉल जप्त केले.
शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, अलिशान फर्निचर चौक, शनिवार पेठ चौक, शनिवारवाडा, वसंत टॉकीज, फरासखाना चौक, कोतवाल चावडी, श्रीनाथ टॉकीज, रामेश्वर चौक आणि गाडीखाना परिसरात कारवाई करून २ हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले. येथून २० पथारी स्टॉल, एक हातगाडी आणि इतर तीन वस्तू जप्त करण्यात आल्या.शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात ही धडक मोहीम यापुढेही नियमितपणे सुरूच राहणार असल्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper




